उस्मानाबाद -: पोलिसाच्‍या ताब्‍यातून पळालेल्या एका आरोपीस तब्‍बल 28 तासानंतर पुणे येथे पोलिसाना अटक करण्यात अखेर यश आले. या प्रकरणी कर्तव्यात कसूर करणा-या दोघा पोलिस कर्मचा-यांना जिल्‍हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शनिवार रोजी तात्‍काळ निलंबित केले आहे.
    संतोष नामदेव धनेराव (रा. सालेगाव, ता. लोहारा) असे फरार झालेल्‍या व पुन्‍हा अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे.  तर भागवत मारुती घाटे व सुधाकर धनु चव्‍हाण असे निलंबत केलेल्‍या पोलीस कर्मचा-यांचे नाव आहे. बलसूर (ता. उमरगा) येथे शिक्षण घेणा-या एका मुलीस संतोष धनेराव  याने फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 19 ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी पालकांच्या फिर्यादीवरून 12 नोव्हेंबरला गुन्हा नोंद होऊन 25 नोव्हेंबरला आरोपी संतोष धनेरावला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याने कोठडीची मुदत संपल्यानंतर संतोषला शुक्रवारी दुपारी उमरगा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विद्याधर मोरे यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. न्यायाधीशांनी संतोषची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याने उमरगा पोलिस ठाण्याचे कर्मचारी भागवत घाटे व सुधाकर चव्हाण हे त्याला जेलमध्ये सोडण्यासाठी हैदराबाद-उस्मानाबाद बसने सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास उस्मानाबाद बसस्थानकावर दाखल झाले. यावेळी आरोपीसह दोन कर्मचारी स्थानकातील कॅन्टीनमध्ये गेले. तेथे संतोषने पोटात दुखतंय पाणी द्या, असे म्हणून लक्ष विचलीत करत हिसका देऊन पळ काढला. यावेळी अंधार असल्याने तो कुठे गेला याचा पोलिसांना पत्ता लागला नाही. दरम्यान, उमरगा येथील पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांनी मोबाइल लोकेशनवरून त्याचा पाठलाग करत अवघ्या 28 तासात पुणे येथे त्यास बेड्या ठोकल्या. मात्र, निष्काळीपणाबद्दल दोन पोलिस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कुर्‍हाड कोसळली आहे. दिवसभरातील या घटना घडामोडीमुळे पोलिस दलाची धावपळ उडाली. आरोपी पळून गेल्याने ओढावलेली नामुष्की मात्र टळली.
    आरोपी संतोष यास उस्मानाबाद येथील कारागृहाकडे घेऊन जात असताना त्याचा मोबाइल त्याला देण्यात आला होता. याच दरम्यान त्याने उस्मानाबादेत पोलिसांना हुलकावणी देऊन पळ काढला. मात्र मोबाइल लोकेशनवरून पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवला. तत्पूर्वी लातूर येथे जाऊन पीडित मुलीकडून तिला पुणे येथे कोणत्या ठिकाणी नेले होते, याची माहिती घेतली. तेथे ओळख देणार्‍या कासुर्डी फाटा (यवत) येथील मोरे नामक महिलेस पोलिसांनी ताब्यात घेऊन संतोषला बोलावून घेण्यास सांगितले. त्यानुसार संतोष कासुर्डी फाटा येथे येताच सापळा रचून बसलेल्या पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे, कॉन्स्टेबल प्रदीप ओव्हाळ व लखन गायकवाड यांनी त्याला ताब्यात घेतले.
    कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोकॉ भागवत घाटे आणि सुधाकर चव्हाण यांना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
आरोपी संतोष धनेराव याला जेलपर्यंत पोहोचविण्यासाठी भागवत गाटे व सुधाकर चव्हाण या दोन पोलिस कर्मचार्‍यांची नेमणूक केली होती. परंतु त्यांच्या तावडीतून आरोपीने पलायन केल्याने दोघांवरही निलंबनाची कारवाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. दोघांवरही कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
 
Top