नळदुर्ग :- शासनाकडून मागासवर्गीयासाठी राबविण्यात येणा-या रमाई आवास घरकूल योजनेचे एक कोटी 54 लाख 50 हजार रूपयाचा निधी खर्च न करताना शासनाकडे परत गेल्‍यामुळे पात्र लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागले. न.पा. प्रशासनाबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्‍यक्‍त केला जात असून त्‍याच्‍या निषेधार्थ रिपाइंच्‍यावतीने मंगळवार रोजी नगरपालिकेवर भव्‍य मोर्चा काढून निषेध व्‍यक्‍त करण्‍यात आला.   
    नळदुर्ग शहरातील मागासवर्गीय पात्र लाभार्थ्‍यांसाठी रमाई आवास योजनेंर्गत प्राप्‍त निधीपैकी सुमारे दीड कोटीपेक्षा अधिक रक्‍कम सुस्‍त प्रशासनाच्‍या हलगर्जीपणामुळे परत गेले. त्‍याच्‍या निषेधार्थ रिपाइंच्‍यावतीने दि. 3 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्‍यात आला. भिमनगर येथील बुध्‍द विहारापासून कुरेशी गल्‍ली, किल्‍ला गेट, चावडी चौक मार्गे हा मोर्चा नगरपालिकेवर धडकला. या मोर्चात रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्‍यक्ष आनंद पांडागळे, जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे, तुळजापूर तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड, युवा तालुकाध्‍यक्ष अरुण लोखंडे, नळदुर्ग शहराध्‍यक्ष बाबासाहेब बनसोडे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर घोडके, उत्‍तम डावरे, दत्‍ता बनसोडे यासह लाभार्थी सहभागी झाले होते. मोर्चेकरांना मार्गदर्शन करताना शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्‍हाण म्‍हणाले की, रमाई आवास योजनेतील परत गेलेला निधी पुन्‍हा मागणी करुन पात्र लाभार्थ्‍यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्‍यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्‍न करेन, असे सांगितले.
    यावेळी कार्यालयीन अधिक्षक प्रभाकर सुरवसे रिपाइंच्‍यावतीने पुढील मागण्‍यांचे निवेदन देण्‍यात आले.     सर्वे नं. 29 मधील (बौध्द नगर) मध्ये फेरनंबर 1502 नुसार दि. 7/6/1985 रोजी मा. तहसिलदार तुळजापूर यांनी हरीजन (दलित) वस्तीवाढ करीता 1 हे. जमीन दिलेली आहे. सदर घराजागेची नोंद नळदुर्ग न.प. च्या दप्तरी घेऊन त्यांना 8-अ ची नक्कल द्यावी व रमाई घरकूल योजनेचा लाभ मिळवून द्यावा, शिवकरवाडी येथील नामांतर नामविस्तार लढ्यातील कहिष्कृत व भुकंपग्रस्त मागासवर्गीय कुटुंबांना नळदुर्ग येथे सर्वे नं. 29 मधील गायरान जमीनीमध्ये घरजागेचा कबाला देऊन त्यांना भुकंप अनुदान वाटप करावे असा आदेश उपजिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी दिनांक 30/8/1996  दिलेला आहे. त्यानुसार त्या आदेशाची दखल घेऊन घरजागा त्यांच्या नावे करावी. तसेच भिमनगर, बौध्दनगर, साठेनगर, येथील वडीलोपार्जीत वहिवाटीत असलेली परंतू त्यांच्या नावे नसलेली घरजागा त्यांच्या नावे करून रमाई घरकूल अवास योजनेचा लाभ मिळवून द्यावा. रमाई आवास घरकुल योजना रबविण्यास निष्काळजीपणा करून या योजनेतील निधी परत पाठविणा-या संबधित दोषी अधिका-यावर अॅट्रासिटी अॅक्टनुसार कारवाई करून रमाई आवास योजनूतील पहिला हप्ता काढताना बेसमेंट कारण्या गोदर द्यावा, रमाई आवास घरकुल योजनेतून घरकुलाचे बांधकाम पुर्ण करणा-या लाभार्थांच्या अंतिम बील त्वरीत काढावे, भिमनगर येथील सांस्कृतीक सभाग्रहास बौध्दनगर, इंदीरानगर व साठेनगर येथील दलित वस्तीतील सर्व प्रलंबित कामे त्वरीत वुर्ण करावीत व प्रलंबीत कामे ठेवणा-या संबंधित गुत्तेदारावर कारवाई करावी, चर्मकार समाजाच्या स्मशानभुमीचे काम पुर्ण करावे, सालेखान मस्जीद ते भिमनगर अर्धवट पाण्याची पाईपलाइन पुर्ण करून भिमनगर येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा, दि. 16 ऑगस्‍ट रोजी झालेल्या नगरपालिकेच्‍या  विशेष सभेतील ठराव क्रमांक 40 नुसार 1995 पूर्वीचे अतिक्रमण करून राहिलेल्या बेघर कुटुंबियाचे अतिक्रमण कायम करावे, आदी मागण्‍यांचे निवेदन देण्‍यात आले.
 
Top