पांगरी (गणेश गोडसे) : गावे निर्मलग्राम करताना त्यासाठी खुप प्रयत्न करून लोकजागृती करत त्यांच्यात त्या विषयावर विचारमंथन करावे लागते, तेव्हा गावच्‍या गावे निर्मलग्राम होऊ शकतात, असे प्रतिपादन कोल्हापुर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व पन्हाळा तालुक्याचे निर्मलग्राम योजनेचे प्रणेते भरत पाटील यांनी केले.
    चारे (ता. बार्शी) गावात आयोजित निर्मलग्राम विषयक कार्यक्रम व व शिवाजी महाविदयालयाच्या श्रमसंस्कार शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणुन भरत पाटील हे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष्स्थानी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर फरताडे होते. यावेळी व्यासपिठावर सोलापुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, जि.प. चे विरोधी पक्षनेते संजय पाटील, बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, पंचायत समितीच्या सभापती कौशल्या माळी, उपसभापती केशव घोगरे, चारेच्या सरपंच नंदा गायकवाड, उपसरपंच संतोष जगदाळे, निर्मल भारत योजनेचे जिल्हा समन्वयक सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
     भरत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, लोकांना टीव्ही मोटारसायकल अथवा इतर चैनीच्या व सुखाच्या वस्तु घ्या म्हणुन सांगण्‍याची गरज भासत नाही, मात्र घरोघरी किमान एकतरी संडास बांधुन त्याचा वापर करा असे वारंवार सांगावे लागते,  ही गोष्‍ट जनतेच्या दृष्टीने लाजीरवाणी आहे. शौचालय निर्मितीसाठी खुप पैशांची गरज भासते हा सर्वसामान्‍यांच्या मनातील गैरसमज त्यांनी काढुन टाकावा. खुप कमी रकमेत साध्या पदधतीने शौचालयाची निर्मिती होऊ शकते. आपली समाजात असलेली इज्जत वाचवण्‍यासाठी तरी किमान शौचालय बांधुन त्यांचा वापर करावा, असे सांगुन त्याचे फायदे सांगितले.
    विरोधी पक्षणेते संजय पाटील चारेकर यांनी प्रास्ताविकात कोणत्याही चांगल्या कार्याची सुरूवात आपल्या गावापासुन झाल्यास उचित ठरते, असे सांगुन चारे गांव शंभर टक्के हागनदारीमुक्त झाल्यामुळे आता गावाच्या व लोकांच्या विकासाला मोठा हातभार लागणार असल्याचे सांगुन शासनाच्या विकासाच्या योजना आता गावात पोचुन गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नसल्याचे यावेळी सांगितले. गावाच्या कोणत्याही कामात ग्रामस्थांच्या एकीची गरज असल्याचे सांगत जनतेने निर्मलग्राम योजनेत स्वताःला झोकुन देऊन गांव हागनदारीमुक्त केल्याचे सांगितले.
    मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांनी गांव निर्मलग्रामम झालेले असल्यामुळे गावच्या सर्वांगिन विकासासाठी व्यापारी संकुल आदी विविध कामांसाठी भरिव निधी उपलब्ध करून देऊ व गावाच्या विकासाला हातभार लावु असे आश्‍वासन दिले. 
 
Top