आर्थिक पाठबळाअभावी दारिद्र्याचे चटके सोसणा-या ग्रामीण तसेच शहरी गृहिणींना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे तंत्र बांगलादेशचे डॉ.मोहंमद युनूस यांनी शोधले आणि जगभर बचतगटांची चळवळ उदयाला आली. महाराष्ट्रात ही चळवळ चांगलीच फोफावली आहे. कमी व्याज दरात सुक्ष्म वित्त पुरवठा आणि महिलांची स्वत:ची थोडी आर्थिक बचत गुंतवणूक यामुळे लाखो महिलांच्या सक्षमीकरणाला बळ मिळाले आहे. गृहोपयोगी वस्तू, खाद्य पदार्थ, गांडूळ खत निर्मिती अशा विभिन्न प्रकारच्या स्वयंरोजगारातून महाराष्ट्रातील लाखो महिलांना स्वाभिमानाने उभे राहण्याचा मार्ग गवसला आहे. नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात विधानमंडळाने साक्षी आणि सोनाली महिला बचतगटांना जागा, पाणी, वीज उपलब्ध करुन येथे येणाऱ्या लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी/कर्मचारी, जनसामान्य यांना घरगुती जेवण, नाश्ता मिळण्याची संधी दिली आणि या बचतगटांनी या संधीचे सोने केले. काय करताहेत हे बचतगट जाणून घेवू या ! आपण त्यांच्याकडून आणि येथे येणा-या लोक प्रतिनिधींकडून.
    प्रपंच चालविण्याची जबाबदारी माझ्यावर नसली तरी माझी स्वत:ची ओळख निर्माण करण्यास साक्षी महिला बचतगटाने मोठी मदत केली आहे. मला छोट्या मोठ्या गरजांसाठी पतीकडे हात पसरावा लागत नाही. अवलंबित भारतीय स्त्री ही ओळख पुसण्यासाठी प्रत्येक महिलेने स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मला वाटते. आज माझ्याबरोबर अन्य 14 महिला आहेत, त्या सर्व दारिद्र्य रेषेखालील गटात मोडतात. त्यांनाही साक्षी महिला बचतगटाने स्वयंरोजगार मिळवून दिला आहे. साक्षी महिला बचतगटाच्या प्रवर्तक लता सतीश रोटके यांचे हे कथन अत्यंत बोलके आहे.
    नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या वर्दळीत नागपूरकर व विदर्भवासियांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत असतो. साक्षी महिला बचतगट आणि श्रीमती भारती वानखेडे यांचा सोनाली महिला बचतगट येथे येणाऱ्या खवय्यांमुळे विधानमंडळाच्या आवारातील सर्वाधिक पसंतीच्या भोजनाचे ठिकाण ठरले आहे.  झुणका-भाकरी, भाजी- चपाती, वरण-भात, ताक, पोहे, उसळ अशा घरगुती विविध पदार्थांची उपलब्धता ही या बचतगटांची खासीयत आहे.
    ‘राजकारणात असल्याने सतत फिरतीवर असतो. त्यामुळे घरच्या जेवणाला आमचे प्राधान्य असते. अधिवेशनाच्या काळात घरच्या जेवणाचे ठिकाण म्हणजे विधानभवन परिसरातील साक्षी महिला बचतगटाचे उपहारगृह. घरगुती जेवण येथे मिळते. खरे तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने शासनाचा हा उपक्रम खरोखरच अतिशय चांगला आहे. महिला बचतगटांना अन्य उद्योग क्षेत्रातही संधी द्यावी’, असे आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी जेवणाचा आस्वाद घेता घेता या बचतगटाबाबत प्रतिक्रिया दिली, तर ‘ महिला बचतगटांना अशी संधी राज्यभर उपलब्ध केली जावी ’, असे आमदार एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार मिराताई कल्याणराव रेंगे-पाटील ह्या भारती वानखेडे संचलित सोनाली महिला बचतगटाच्या उपहारगृहात झुणका-भाकर जेवणाचा आस्वाद घेत होत्या. त्या म्हणाल्या चांगले घरगुती जेवण या महिला बचतगटाच्या स्टॉलमध्ये मिळते. बहुतेक आमदार या ठिकाणी जेवतात. येथे जेवताना घरगुती जेवण्याचे समाधान मिळते. महिला बचतगटातील सदस्यांना अशा प्रकारच्या उपक्रमातून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ मिळत आहे.
    उमरेड विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर पारवे आणि हिंगणे विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय घोडमारे यांच्या प्रतिक्रियाही फार बोलक्या  होत्या. ‘ज्या ठिकाणी हॉटेल्स नाहीत अशा सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या बचतगटांना संधी दिली जावी,’ असे आमदार सुधीर पारवे म्हणाले तर आमदार विजय घोडमारे म्हणाले, ‘महिलांचे सक्षमीकरण करण्याची ही संकल्पना अतिशय चांगली आहे. येथे जेवणही चांगले आहे. केवळ अधिवेशन काळातच नव्हे तर इतर वेळीही एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालय, वैद्यकीय रुग्णालय येथे महिला बचतगटांना स्टॉल्स मिळाले तर सर्वसामान्य माणसाला स्वस्त व चांगल्या घरगुती जेवणाची सोय होईल.’ झी चॅनलचे प्रतिनिधी मनोज भोये म्हणाले की, ‘महिला बचतगटांचा हा उपक्रम स्तुत्य असून याच्या माध्यमातून महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध होतील. टिव्ही नाईनचे प्रतिनिधी रामराजे शिंदे म्हणाले, महिला बचतगटांचे हे उपहारगृह म्हणजे त्यांना मिळालेले प्रोत्साहन आहे. आज बचतगटांद्वारे हजारो स्त्रियांना आधार मिळत असून त्यांना मार्केट, मॉल्स येथेही संधी मिळाली तर सक्षमीकरण्याच्या या उपक्रमास आणखी बळ मिळेल.
    साक्षी आणि सोनाली बचतगट हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. अशा प्रकारचे अनेक बचतगट आहेत, ज्यांच्या माध्यमातून आज महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध झाले आहेत. विधिमंडळात चालू असलेल्या बचतगटाच्या या उपहारगृहांना वीज, पाणी व मंडप, खुर्च्या, टेबल असे साहित्य मोफत देण्यात आले आहे. दोन्ही बचतगटातील सुमारे 30 महिलांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे संसाराला त्यांचाही हातभार लागतो. स्वाभिमानाने त्या जगत आहेत. विधिमंडळात सुरु असलेल्या बचतगटाच्या उपहारगृहाचा लाभ अधिवेशनकाळात येणारी जनता, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांना होत असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे उत्तम पाऊल आहे, असे म्हणावे लागेल.

   - आकाश जगधने
     सहाय्यक संचालक
 
Top