उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील ईटकूर येथील ग्रामस्थांशी चर्चा करत खासदार निधीतुन दत्त मंदिराच्या समोरील सभागृहाच्या बांधकामासाठी दहा लाख रूपये उपलब्ध करून दिले आहेत. याच पद्धतीने प्रत्येक गावात लोकांच्या मागणीनुसार आपण निधी उपलब्ध करून द्यायचे नियोजन केले होते. त्यातुनच कळंब तालुक्यात विशेष निधीतुन ७२ विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठी ३ कोटी ६ लाख रूपये निधी शासन निर्णयानुसार मंजूर झाला आहे, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बोलताना सांगितले.
    कळंब तालुक्यातील मौजे ईटकूर व कोठाळवाडी येथे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक शाखांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी लोकांना संबोधित करत असताना आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, आपल्या भागाच्या विकासासाठी युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक लोकहिताच्या योजना आहेत. परंतू सर्वसामान्य जनता या योजनांच्या लाभापासून वंचित राहते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवकांकडून अपेक्षा ही जिल्ह्यात नुकतीच जिवनदायी आरोग्य योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ३.५० लाखापेक्षा जास्त कुटूंबांना होणार आहे. या योजनेच्या माध्यमातुन वैद्यकिय उपचारासाठी प्रति कुटूंब प्रती वर्षे १.५० लाख रूपयांपर्यंत शासनाकडून मदत मिळणार आहे. युवकांनी या योजनेची स्वत: माहिती घेऊन आपल्या गावातील रुग्णांना व त्यांच्या कुटूंबीयांना या योजनेची माहिती द्यावी व रूग्णांना सहकार्य करावे असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
    महावितरणकडून शेतक-यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत होता त्याबाबत त्यांना सक्त सुचना देण्यात आल्या असुन सरसकट डि. पी. बंद न करणे, नादुरुस्त डि. पी. महावितरणच्या वाहनाद्वारे दुरुस्तीसाठी आणण्याबाबत किंवा शेतक-यांनी खाजगी वाहनाद्वारे आणल्यास त्याचे बिल अदा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक महिन्याला तालुकास्तरावर कार्यकारणी अभियंत्याच्या उपस्थितीत बैठक घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शेतक-यांनी यापुढे किट कॅट, फ्युज केबल आदिसाठी शेतक-यांनी पैसे न देण्याचे आवाहन देखील केले.
    सन २००७ मध्ये उस्मानाबाद तालुक्यामध्ये पहिले पॉलीहाऊस चालु करण्यात आले होते. यानंतर उस्मानाबाद शहरालगतच्या युवकांनी पुढाकार घेऊन बरेच पॉलीहाऊस सुरु केले आहेत. ईटकूर येथे देखील युवकांनी उपळा येथील युवकांच्या मदतीने एक पॉलीहाऊस लवकरच सुरु करावे अशी अपेक्षा आ. पाटील यांनी याप्रसंगी केली.
    कोठाळवाडी येथे एक व ईटकूर येथे तीन राष्ट्रवादी युवक शाखांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष रामहरी शिंदे, डी. सी. सी. चे संचालक भागचंद बागरेचा, युवक अध्यक्ष अ‍ॅड. प्रविण यादव, तालुका युवक अध्यक्ष अरूण चौधरी, उपसरपंच महादेव आडसुळ, राजाभाऊ आडसुळ, विलास गाडे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखेचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top