उस्मानाबाद : उस्मानाबाद नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ८ (क) च्या रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीने बाजी मारली असुन राष्ट्रवादीचे उमेदवार मनियार फौजिया बेगम मोईनोद्दीन यांनी विजय मिळवला असुन त्यांनी काँग्रेसच्या मुजावर रहीमुन इसामोद्दीन यांचा ११६ मतांनी निसटता पराभव केला. या विजयामुळे राष्ट्रवादीचे नगरपालिकेतील संख्याबळ आणखी भक्कम झाले आहे.
    उस्मानाबाद नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ८ (क) च्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोट निवडणुक लागली होती. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनियार फौजिया मैईनोद्दीन तर काँग्रेसकडून मुजावर रहिमुन इसमोद्दीन यांच्यासह अपक्ष म्हणुन साधना सतिश कदम, सुरेखा तात्या करवर शर्मिला संभाजी सलगर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र मतदानापुर्वीच शर्मिला सलगर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. गतनिवडणुकीमध्ये या प्रभागात काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते. पाच पैकी चार जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. या प्रभागात झालेल्या पराभवामुळे राष्ट्रवादीची चांगलीच नाचक्की झाली होती. परंतू या प्रभागाच्या लागलेल्या पोट निवडणुकीत झालेल्या पराभवाची वचपा काढण्याची चांगली संधी राष्ट्रवादीकडे आली होती. त्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते कामाला लागले होते.
    काल या जागेसाठी मतदान झाले होते. या प्रभागात असलेल्या ११ हजार ५५६ मतदारांपैकी ४८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. अतिशय अटीतटीच्या होत असलेल्या या लढतीत मतदारांनी ब-यापैकी प्रतिसाद दिल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुक्ता शिगेला पोहंचली होती. आज दि. १६ रोजी स. १० वा. तहसील कार्यालयातील हॉल मध्ये चार टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी एकुण १५ मतदान केंद्रापैकी ८ केंद्रावर राष्ट्रवादीच्या मनियार यांनी आघाडी घेत काँग्रेसच्या मुजावर यांचा ११६ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या उमेदवार मनियार फौजिया बेगम यांना २८५१ मते मिळाली. तर काँग्रेसच्या मुजावर रहिमून इसमोद्दीन यांना २७३५ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार साधना सतिश कदम यांना २९, तर करवर सुरेखा तात्या यांना २३ मते, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेल्या शर्मिला सलगर यांनाही ५४ मते मिळाली. ५७५३ मतांपैकी एकुण ६१ मते अवैध निघाली.
    एकुणच अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीने विजय मिळवल्यामुळे व मागच्या निवडणुकी काँग्रेसकडून झालेल्या पराभवाची परतफेड केल्याची चर्चा परिसरात होत आहे.
 
Top