उस्मानाबाद :- वाचनसंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने 4 ते 6 फेब्रुवारी  या कालावधीत ग्रंथोत्सव-2014 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांस्कृतिक सभागृह, आनंदनगर येथे हा ग्रंथोत्सव होणार असून यानिमित्त दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता शहराच्या विविध भागात असणा-या शाळा-महाविद्यालयातून  निघणारी ग्रंथदिंडी हे एक आगळे वैशिष्ट्य या उपक्रमाचे राहणार आहे.
       राज्याच्या सांस्कृतिक धोरणानुसार या उपक्रमांचे आयोजन राज्यातील सर्व जिल्ह्यात करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
         दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता शहरातील विविध 7 शाळा-महाविद्यालयातून ही फेरी निघेल. वाचनसंस्कृती आणि ग्रंथ-पुस्तकांचे महत्व सांगणारे फलक विद्यार्थ्यांच्या हाती राहणार आहेत.
या ग्रंथफेरीत रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, श्रीपतराव भोसले हायस्कूल, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), छत्रपती हायस्कूल, तेरणा महाविद्यालय आणि सरस्वती महाविद्यालय सहभागी होणार आहेत. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य-मुख्याध्यापक, मराठी विभागप्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक, विद्यार्थी प्रतिनिधी, मराठी अभ्यास मंडळ सदस्य, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी, मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
      शहर वाहतूक पोलीसांच्या सहकार्याने वाहतुकीला अडथळा येणार नाही, अशा पद्धतीने ही फेरी निघणार आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातून निघणारी ग्रंथफेरी जिल्हा परिषद कन्या प्रशाला-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा-समतानगरमार्गे सांस्कृतिक सभागृह येथे येईल.
       महाजन महाविद्यालयातून निघणारी फेरी सांजा रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- जिल्हाधिकारी कार्यालय-पोलीस अधीक्षक कार्यालयमार्गे ग्रंथोत्सवाच्या ठिकाणी येईल. भोसले हायस्कूल येथून निघणारी ग्रंथफेरी जिजाऊ मॉंसाहेब चौक-आनंदनगर (पाटबंधारे कार्यालयमार्गे) कार्यक्रमस्थळी येईल.  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) येथून निघणारी ग्रंथफेरी डीआयसी रोडमार्गे सेंट्रल बिल्डींग- पोलीस निवास वसाहतमार्गे कार्यक्रमस्थळी येईल. तेरणा महाविद्यालायाची ग्रंथफेरी संत ज्ञानेश्वर मंदिर- भानूनगर-सेंट्रल बिल्डींगमार्गे कार्यक्रमस्थळी येईल. सरस्वती महाविद्यालयातून निघणारी ग्रंथफेरी बॅंक कॉलनी-पोलीस निवास वसाहतमार्गे कार्यक्रमस्थळी येणार आहे.
      छत्रपती शिवाजी हायस्कूल येथून निघणारी ग्रंथफेरी सिव्हील हॉस्पिटल- जिल्हाधिकारी निवासस्थान-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा-समतानगरमार्गे कार्यक्रमस्थळी येईल.
 
Top