प्रतिकात्‍मक
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्‍यातील जळकोटवाडी (नळ) येथील भांगी तांड्यावरील गोपिनाथ रामा राठोड यांच्या घरास आग लागल्याने विद्युत वायरिंग जळून ठिणग्या पडून आगीच्या भक्षस्थानी पडले. यात तब्बल पाच लाखाचे नुकसान झाले.
    जळकोटवाडी (नळ) येथील भांगी तांड्यावरील गोपिनाथ रामा राठोड हे स्वत: पत्नीसह चार मुले, सुना, एक मुलगी, नातवंडासह विभक्तपणे मात्र एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यात राहतात. प्रत्येकजण शेतमजुर असल्याने दि. २४ रोजी सकाळीच कामासाठी सर्वजण बाहेर गेले होते. लहान मुले शाळेला गेली होती. त्यामुळे घरात कोणीही गेले नसल्याने घर कुलूपबंद होते. त्यामुळे मनुष्यहानी झाली नाही हे सुदैव. विज भारनियमनामुळे सकाळी १० नंतर विजेचा प्रवाह चालु होतो. विज प्रवाह चालु झाल्याने घरातील वायरिंग जळून ठिणग्या पडल्याने दु. १ ते २ च्या दरम्यान आग लागून कपडे, अंथरून, पांघरून क्षणार्थात पेटल्याने घरातील गोदरेज कपाट चार नग, फ्रिज दोन नग, कुलर दोन नग, टि.व्ही. २ नग, शिलाई मशिन एक नग, छतावरील फॅन ३ नग, दिवाणी पलंग एक नग, ज्वारी ६ पोते, तुर २ पोते, साळी ५ पोते, सोयाबिन ४ पोत, चार कुटूंबाची भांडी, पत्रे ३६ नग यासह घरात ठेवलेले सोने ६ तोळे, रोख रक्कम ५० हजार, असे एकूण पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे जळकोट सज्जाचे तलाठी आर. एम. औटी, जळकोट मंडळ अधिकारी ए. जी. कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्याने स्पष्ट झाले. जळीतग्रस्त कुटूंबांनी नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी विनंती लेखी अर्जाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
 
Top