नळदुर्ग :- भगवा ध्‍वज फाडून त्‍याची विटंबना करणा-या  समाजकंटकावर कठोर कारवाई करण्‍याची मागणी नळदुर्ग शहरातील हिंदू बांधवांच्‍यावतीने  सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांच्‍याकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.  यावेळी पोलीस ठाण्‍यात 300 ते 400 तरुणांनी एकत्र येऊन हे निवेदन दिले. दरम्‍यान या घटनेच्‍या निषेधार्थ आज बुधवार रोजी नळदुर्ग शहर बंदची हाक देण्‍यात आली आहे. तसेच शहरातील भवानी चौकात सकाळी दहा वाजता निषेध सभेचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    नळदुर्ग शहरापासून पूर्वेकडे असलेल्‍या आलियाबाद शिवारात राष्‍ट्रीय महामार्गालगत श्री वीरभद्रेश्‍वरचेेेे मंदीर आहे. दरवर्षी दि. 25 जानेवारी रोजी या ठिकाणी यात्रेनिमित्‍त महापूजा व महाभिषेक करण्‍यात येतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्‍याने मंदीर परिसर सुशोभित करण्‍याबरोबरच त्‍या ठिकाणी परंपरेनुसार असणारा भगवा ध्‍वज लावला जातो. दि. 25 जानेवारी रोजी जुना भगवा ध्‍वज काढून नवीन ध्‍वज लावण्‍यात आला होता. दि. 27 जानेवारी रोजी काही समाजकंटकांनी हा भगवा ध्‍वज फाडून विटंबना केली आहे. यामुळे हिंदू बांधवांच्‍या भावना दुखावल्‍या असून पोलिसांनी या समाजकंटकांना तात्‍काळ अटक करुन त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.
    निवेदन देताना शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख तथा नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, नगरसेवक नितीन कासार, संजय बताले, माजी नगरसेवक अमृत पुदाले, सुधीर हजारे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले, भाजपाचे शहराध्‍यक्ष पद्माकर घोडके, सुशांत भूमकर, धिमाजी घुगे यांच्‍यासह जवळपास 300 ते 400 तरुण उपस्थित होते.
    दरम्‍यान, या घटनेच्‍या निषेधार्थ आज बुधवार रोजी नळदुर्ग शहर बंदचे आवाहन करण्‍यात आले आहे. तर सकाळी 10 वाजता नळदुर्ग येथील भवानी चौकात निषेध सभेचे आयोजन करण्‍यात आले आहे. पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांनी याप्रकरणी गुन्‍हा दाखल करुन आरोपींना अटक करण्‍याचे आश्‍वासन दिले.
 
Top