नळदुर्ग :- ध्‍वज फाडून विटंबना केल्‍याप्रकरणी समाजकंटकावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी तसेच घटनेच्‍या निषेधार्थ बुधवार दि. 29 जानेवारी रोजी नळदुर्ग शहर बंदचा इशारा दिला होता. त्‍यानुसार नळदुर्ग शहरातील मुख्‍य बाजारपेठ बंद होती. तर अन्‍य ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळला. जळकोट व अणदूर गाव पूर्णपणे बंद असल्‍याचे दिसून आले. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
      याप्रकरणी नळदुर्ग शहरातील तीनशेपेक्षा अधिक नागरिकांनी पोलीसांना व संबंधितांना निवेदन दिले. नळदुर्ग शहरापासून जवळच असलेल्‍या महामार्गावरील आलियाबाद शिवारात आपलं घर समोरील दरीत असलेले श्री  विरभ्रदेश्‍वरचे पुरातन मंदीर आहे. दरवर्षी 25 जानेवारी रोजी या ठिकाणी यात्रा भरते. त्‍या निमित्‍ताने महापुजा व महाभिषेक करण्‍यात येतो. प्रत्‍येक‍वर्षी जुना भगवा ध्‍वज काढून नवा ध्‍वज लावण्‍यात येतो. दि. 25 जानेवारी रोजी जुना भगवा ध्‍वज काढून नवीन ध्‍वज लावण्‍यात आला होता. दि. 27 जानेवारी रोजी काही समाजकंटकांनी हा भगवा ध्‍वज फाडून विटंबना केल्‍याचे उघ्‍डकीस आले. यामुळे हिंदू बांधवांच्‍या भावना दुखावल्‍या असून पोलिसांनी त्‍या समाजकंटकांना तात्‍काळ अटक करुन त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. निवेदन देताना शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख तथा नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, नगरसेवक नितीन कासार, संजय बताले, माजी नगरसेवक अमृत पुदाले, सुधीर हजारे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले, भाजपाचे शहराध्‍यक्ष पद्माकर घोडके, सुशांत भूमकर, धिमाजी घुगे यांच्‍यासह जवळपास 300 ते 400 तरुण उपस्थित होते.
    दरम्‍यान, या घटनेच्‍या निषेधार्थ आज बुधवार रोजी नळदुर्ग शहर बंदचे आवाहन करण्‍यात आले होते. त्‍यास उत्‍सफुर्त प्रतिसाद मिळला. तर सकाळी 10 वाजता नळदुर्ग येथील भवानी चौकात निषेध सभा घेण्‍यात आली. यावेळी नगराध्‍यक्ष शहबाज काझी, नगरसेवक नितीन कासार, शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, संजय बताले, प्रा. जावेद काझी, अमृत पुदाले, सचिन डुकरे, सरदारसिंग ठाकुर, संतोष पुदाले, शरद बागल यांच्‍यासह शेकडो नागरिक उपस्‍थित होते.
          पोलिसात दि. 29 रोजी महेश सिध्‍देश्‍वर कोप्‍पा दिलेल्‍या फिर्यादीत म्‍हटले आहे की, दि. 28 रोजी माझ्या शेतात सकाळी साडेआठ वाजण्‍याच्‍या सुमारास काम करीत असताना हायवे रोड लगत असलेल्‍या लिंबाच्‍या झाडावर लावलेला भगवा ध्‍वज कोणीतरी अज्ञात समाज कंटकाने फाडुन तुकडे केल्‍याचे दिसले. त्‍यामुळे आमच्‍या धार्मिक भावाना दुखावल्‍या. त्‍यावरून पोलिसानी तपासाचे चक्रे वेगाने फिरवुन सय्यद गौस फयाज रिझवी (वय 23), सय्यद मस्‍तान ताहेरअली (वय 22) दोघे रा. महंमद पनाह गल्‍ली, नळदुर्ग याना अटक केली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड हे करीत आहेत.
 
Top