बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बनावट नंबर वापरुन चोरीचे वाहन चालविणार्‍या दोन संशयीतांना नितीन मुंढे यांनी बार्शी पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरच्या चोराने हे वाहन चोरुन आणल्याचे आढे वेढे घेत तात्काळ कबूल केले असून आणखी बर्‍याच वाहन चोर्‍या उघड होण्याची शक्यता आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी, पुणे येथे वाहतूक शाखेत काम करणारे नितीन मारुती मुंढे हे १० दिवसांच्या अर्जित रजेवर गावाकडे आले होते. आपल्या मित्राकडे थोडावेळ भेट करुन इकडच्या तिकडच्या गप्पा आणि आणखी काही बोलण्यासाठी विनोद ननवरे यांच्याकडे दुपारी आले होते. गप्पा मारणे सुरु होते यावेळी अचानकपणे समोरुन एका दुचाकीवर दोघेजण निघून गेले नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांचे लक्ष त्या नंबरवर होते. नंबरची सिरीयल, वाहन, त्याचा रंग इत्यादी अनेक बारकावे काही क्षणात टिपले असता त्यांना सदरच्या वाहन क्रमांकावरुन त्या वाहनाविषयी शंका निर्माण झाली. सदरचे वाहन आणि त्याचा वाहन क्रमांक जुळून येत नसल्याचे गणित त्यांनी काही क्षणात मनातल्या मनात केले. आणि आपल्या मित्राला त्याचे वाहन घे आपण त्या वाहनाचा पाठलाग करु मला शंका येत असल्याचे म्हटले. मित्राच्या वाहनावर दोघेजण निघाले असता काही मिनीटातच ते दोघे संशयीत पुन्हा माघारी त्या दिशेने येतांना दिसल्याने त्या दोघांना रस्त्यात अडवून विचारपूस केली. यावेळी त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली आणि जणू काही आपणच या वाहनाचे खरे मालक व विचारपूस करणार्‍याचा काहीच संबंध नसल्याप्रमाणे ते दोघे संशयीत उर्मट भाषेत बोलू लागले. मुंढे यांनी आपण पोलिस असल्याचे सांगताच त्यांच्या भाषेत बदल झाला आणि पोपटासारखे बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांचे नांव वाहन चालविणारा अशोक काळे आणि सोबत असलेल्या दुसर्‍याने अंकुश पवार असल्याचे सांगीतले. त्या दोघांना पोलिस ठाण्याकडे नेत असतांना त्यांनी मुंढे यांना काही रक्कम देण्याचे आमिषही दाखविले परंतु मुंढे यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता रोजच्याप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडले ते वाहन आणि त्या दोन संशयीतांना बार्शी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्यासमक्ष हजर करुन सुट्टीवर जरी असले तरी आपली नजर आणि प्रामाणिकपणा व दैनंदिन जीवनात चोर कशा प्रकारे सर्वसामान्यांत मिसळून फिरतांना दिसत आहेत याचा नमुना दाखवून दिला.
        ज्या संशयीतांना ताब्यात घेतले आहे त्यांची नावे खरी आहेत का, त्यांनी आणखी किती वाहनांची चोरी केली, असल्यास त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली. त्यांच्या पाठीशी कोण आहे, आजपर्यंत गुन्हेगारी क्षेत्रात त्यांचे रेकॉर्ड तयार आहे का असल्यास किती गुन्ह्याशी त्यांचा संबंध येतो या प्रश्‍नांची उत्तरे बार्शी पोलिसांनी कसून तपास केल्यास समोर येतील.
 
Top