परंडा -: माणकेश्वर (ता. भूम) येथे गुप्तधनाच्या लालसेतून खोदकाम करणार्‍या सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्यासह 19 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी यापूर्वी एकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवार दि. 22 जानेवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
    भूम तालुक्‍यातील माणकेश्वर येथे शनिवार दि.18 जानेवारी रोजी रात्री गुप्तधनाच्या लालसेतून खोदकाम करण्याचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला होता. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर, त्यांचा मुलगा तथा शिवसेना बार्शी शहरप्रमुख दीपक आंधळकर यांच्यासह 19 जणांविरुद्ध परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान घटनेदिवशी पोलिसांनी गणपत कातोरे यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आणखी दोघांना बुधवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक केली. यामध्ये वसंत रामसिंग चव्हाण याला जेवळी (ता. लोहारा) तर दिलीप रंभाजी बनसोडे याला सांगोला या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले आहे.
 
Top