उस्मानाबाद :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी विषयांकित  परीक्षा रविवार,दि.2 फेब्रुवारी,2014 रोजी होत आहे. श्रीपतराव भोसले हायस्कूल, (जूनी इमारत),  श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज (नवीन इमारत तळमजला), श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज (नवीन इमारत पहिला मजला),  श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज (नवीन इमारत दुसरा मजला), श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज (नवीन इमारत तिसरा मजला) आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद या परीक्षा केंद्रांवर ही  परीक्षा होत असून परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 10-30 ते दुपारी 1 आणि दु. 2-30 ते सायंकाळी 5 या कालावधीत  होणार असल्याने  2  फेब्रुवारी रोजी सर्व परीक्षा केंद्राचे परिसरात सकाळी 8 ते सायंकाळी  6  वाजेपर्यंत  प्रतिबंधात्मक आदेश  लागू करण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी  संजय  गायकवाड यांनी कळविले आहे.
    या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात घोषणा देण्यास, परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स , पानपट्टी, टायपींग सेंटर, एस.टी.डी.बुथ, ध्वनीक्षेपक, कॉम्पूटर सेंटर्स तसेच इंटरनेट कॅफे बंद राहतील. परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर पसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही वाहनास प्रतिबंध असेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रांवर नेमणूक केलेले अधिकारी/ कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवारांनाच परीक्षा केंद्रांवर प्रवेश असेल. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. हे आदेश संबंधित दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
 
Top