उस्मानाबाद -: श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद बहि:शाल शिक्षण मंडळ पुरस्कृत वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (पंचायतराज) तालुक्यातील नुतन महिला ग्रामपंचायत सदस्यांसाठी महाविद्यालयाच्या सभागृहात दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
      या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उमरगा पंचायत समिती सभापती अक्षरताई सोनवणे तर उदघाटक म्हणून गटविकास अधिकारी बी. बी. खंडागळे हे होते. यावेळी पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, मुरुडचे महेंद्र पांगळ, प्राचार्य डॉ. एन. डी. शिंदे, निर्मलग्राम अभियानचे रमाकांत गायकवाड, कार्यक्रम अधिकारी एस. पी. इंगळे, कॉमर्स विभाग प्रमुख तथा बहि:शाल शिक्षण मंडळाचे समन्वयक प्रा.डॉ. संजय अस्वले, पंचायत समितीचे  विस्तार अधिकारी किरनाळे आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
     खंडागळे म्हणाले की, महिला मेळाव्यातून महिलांना त्यांच्या  हक्काची जाणीव होईल. विकासकामात महिलांना सहभागी करुन घ्यावे. तरच तालुक्यांचा विकास होईल.
     सौ. सोनवणे यांनी महिलांना दिलेले आरक्षण हेच प्रगतीची सुरुवात आहे. महिलांना या मेळाव्यातून महिला कायद्याची ओळख होईल व या महिला त्यांच्या हक्कासाठी प्रयत्न करतील, असे सांगितले. 
       यावेळी प्राचार्य शिंदे म्हणाले की, आदर्श समाज घडविण्यासाठी महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. या भागातील महिलांनी पुढे यावे, यासाठी महाविद्यालयात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन कार्यक्षम पिढी निर्माण करण्यासाठी मोलाचे सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक श्रीमती स्वामी यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण सत्र
    गायकवाड यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, पंचायत राज संस्थामार्फत विविध पदावर काम करुन आदर्श ग्राम करण्यासाठी व गाव हांगणदारी मुक्त करुन पर्यावरण संतुलनासाठी सहभाग घेण्याचे आवाहन उपस्थित महिला प्रतिनिधींना केले. श्री. पांगळ यांनी पंचायत राज महिला सदस्यांचे अधिकार व हक्क व कर्तव्य विषयक माहिती देऊन गावचा विकास साधण्यासाठी मासिक सभा, ग्रामसभा, वार्ड सभा घेऊन  महिलांमध्ये जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले. देवीकुमार पाठक यांनी महिलांना पाण्याचे महत्व पटवून देऊन रेन वॉटर हार्वेस्टिंगचे तंत्र प्रत्येकांनी वापरावे. जलसंवर्धनासाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी  केले.
   प्रा.डॉ.अस्वले यांनी पंचायतराज ग्रामपंचायत अधिनियम कायदा, जिल्हास्तरीय शासन आणि ग्रामसभेची भूमिका आणि महिला सदस्यांचे कार्ये व अधिकार या विषयावर या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
      जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अशोक माळगे यांनी महाराष्ट्र शासनाने मुखपत्र असणाऱ्या लोकराज्य मासिकाबाबत माहिती देऊन घरोघरी लोकराज्य पोहचविण्यासाठी महिला सदस्यांनी पुढाकार घेण्याबाबत सांगितले. तसेच प्रत्येक गावांनी लोकराज्य ग्राम करण्याचेही त्यांनी सागून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दि.4 ते 6 फेब्रुवारी या काळात सांस्कृतिक सभागृह, आनंद नगर, उस्मानाबाद येथे आयोजित ग्रंथोत्सव-2014 ची माहिती देऊन सर्वांनी सहभागी व्हावे,असे सांगितले.   
      यावेळी समारोप सत्रात महिला सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात येऊन उपप्राचार्य डॉ. डी.एल.बिराजदार यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. या दोन दिवशीय महिला कार्यशाळेस जिल्हा परिषदेच्या सदस्य, पंचायत समिती सदस्य, नुतन महिला सरपंच, सदस्य  यांनी  सहभाग घेतला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ.अस्वले यांनी करुन आभार मानले.
 
Top