कळंब (भिकाजी जाधव) :- मोहा (ता. कळंब) येथील भुमीपुत्र कै. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांनी मराठवाड्यातील बहुजन समाजातील तरुणांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मोहा (ता. कळंब) येथे सन 1951 साली उभारलेल्‍या ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित ज्ञान प्रसारक माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालयाच्‍या नुतन इमारतीचे उदघाटन दि. 3 फेब्रुवारी रोजी गृहमंत्री ना. आर.आर. पाटील यांच्‍या हस्‍ते होणार आहे. त्‍याचबरोबर शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अॅग्रो इंडस्‍ट्रीज प्रा.लि. चे भुमीपुजन व कोनशिला अनावरण समारंभ मान्‍यवरांच्‍या उपस्थितीमध्‍ये संपन्‍न होणार असल्‍याची माहिती ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर यांनी दिली.
           या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण हे तर प्रमुख पाहुणे म्‍हणून स्‍वच्‍छता व पाणीपुरवठा मंत्री ना. दिलीपराव सोपल, उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे, आ. ओमराजे निंबाळकर, आ. सतीश चव्‍हाण, आ. विक्रम काळे, महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन मंडळाचे अध्‍यक्ष जीवनराव गोरे, ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्‍यक्ष आबासाहेब बारकुल आदी मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत.
       मोहा व परिसरामध्‍ये ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्‍यामुळे या ठिकाणी ऊस उद्योगासाठी अनुकूल असे वातावरण आहे. त्‍याचबरोबर शेतक-यांची विविध साखर कारखान्‍यांकडून होणारी हेळसांड लक्षात घेऊन या ठिकाणी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अॅग्रो इंडस्ट्रिज प्रा.लि. ची उभारणी करण्‍यात येत आहे. या अॅग्रो इंडस्ट्रिजमुळे स्‍थानिक शेतक-यांचा ऊस गाळपाचा प्रश्‍न मिटणार आहे. त्‍याचबरोबर शेतक-यांचा आर्थिक स्‍तर उंचावुन स्‍थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या कारखान्‍यातून मुख्‍यतः सेंद्रीय गुळ, गुळ पावडर, काकवी, मॉलिसेस (गुळाचा द्रावण) व आधुनिक काळातील मानवाच्‍या गरजा लक्षात घेता अतिशय पौष्‍टीक व आरोग्‍यवर्धक अशी उत्‍पादने या अॅग्रो इंडस्ट्रिजमधून घेण्‍यात येणार आहेत.
      तरी या कार्यक्रमास कळंब तालुक्‍यासह परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे अावाहन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर, चेअरमन हनुमंत मडके यांनी केले आहे.        
 
Top