सोलापूर :- सुप्रशासनासाठी माहितीचा अधिकार कायदा महत्वाचा आहे या कायद्याची सर्वसामान्य जनतेमध्ये आणखी जनजागृती वाढली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी केले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील विविध खात्याच्या प्रमुख अधिका-यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना गायकवाड म्हणाले की, माहिती अधिकार कायदा देशात लागू झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक अर्ज येत आहे. अर्जाच्या निकाली काढण्याचे प्रमाणही राज्यात चांगले आहे. महाराष्ट्र या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अग्रेसर असल्याचे सांगितले. माहिती अधिकारांतर्गत अर्ज आल्यास 30 दिवसात उत्तर दिलेच पाहिजेत याबाबत नोंदणीचे रजिस्टर व्यवस्थित ठेवावे. याअंतर्गत प्राप्त अर्जाची शक्यतो जनमाहिती अधिका-यांच्या स्तरावरच समाधानकारक योग्य माहिती देऊन निकाली काढावे. तसेच पहिल्या अपीलात अर्ज आल्यास प्रभावीपणे काम करुन अपिलकर्त्यांचे समाधान होईल यासाठी प्रयत्न करावा. याबाबत सविस्तर मार्गदर्शन श्री. गायकवाड यांनी केले.
    माहिती अधिकारांतर्गत लोक विचारु शकतात अशी माहिती बेवसाईटवर टाकावी. या कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्याच्या माहितीचे रेकॉर्ड अद्यावत ठेवावे. टपाल शाखेतून वेळवेर अर्ज संबंधितांकडे येतात व दिलेली माहिती अर्जदारास वेळेत पाठविली जाते की नाही याची खात्री करावी अशा सूचना श्री. गायकवाड यांनी दिल्या.
    तसेच या कायद्याची प्रभावीपणे जनजागृती होण्यासाठी जिल्हा नियोजनाच्या नाविन्यपूर्ण बाबीतून कार्यशाळा, प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन व्यक्तिंना यासाठी यशदा पुणे यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात यावे व या प्रशिक्षण घेतलेल्या अधिका-यामार्फत संपूर्ण जिल्ह्यात प्रशिक्षण देऊन या कायद्याची आणखी काटेकोरपणे अंमलबजावणी होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
    माहिती अधिकार कायदा हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील नागरिकांना मिळालेले मोठे शस्त्र आहे. याचा योग्य वापर झाला पाहिजे. माहिती अधिकारांतर्गत अर्ज स्विकारण्यासाठी प्रायोगिक तत्वावर  ई मेल सेवेद्वारे काम करण्यात आले असल्याचेही श्री. गायकवाड यांनी सांगितले. माहिती अधिकार कायद्यांतर्गत गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन करुन उपस्थित अधिका-यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.
 
Top