नागपूर : मागील दहा वर्षात केलेल्या उल्लेखनीय व नेत्रदीपक प्रगतीमुळे अन्नधान्याच्या बाबतीत निर्यात करणारा देश म्हणून आज भारताची ओळख झाली आहे. या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती होऊन अधिक उत्पादन करण्याची उमेद शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे व्यक्त केला.
    केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या परिसरात आयोजित “कृषी वसंत” या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते आज झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल के. शंकरनारायणन्, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, केंद्रीय कृषी सचिव आशिष बहुगुणा, भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष एस. गोपालकृष्णन, भारतीय कृषी संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अय्यपन, राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया आदी प्रमुख उपस्थितीत होते. केंद्रीय कृषी व अन्न प्रक्रिया मंत्रालय, महाराष्ट्र शासन तसेच भारतीय उद्योग महासंघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनामध्ये कृषी, फलोत्पादन तसेच प्रक्रिया उद्योग आदी तंत्रज्ञानाची माहिती भारतातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
    राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले, एकेकाळी अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलिया आदी देशात जाऊन अन्नधान्याच्या आयातीसाठी करार करावा लागायचो. परंतु, गत दहा वर्षात कृषी क्षेत्रात झालेल्या आमूलाग्र बदलामुळे शेतकऱ्यांनी अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन घेतले. आज जगात गहू व तांदूळाच्या उत्पादनामध्ये तसेच निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. यावर्षी 263.63 दशलक्ष मेट्रिक टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे.
    अन्न सुरक्षा योजना राबविताना अनेकांनी शंका व्यक्त केल्या होत्या परंतु, शेतकऱ्यांच्या परिश्रमावर आपला विश्वास असल्यामुळे हा कायदा मंजूर करण्यात आला असल्याचे सांगताना राष्ट्रपती म्हणाले की, उद्योग व कृषी क्षेत्राने एकत्र येऊन समन्वयाने व सहकार्याने कार्य केल्यास शेती क्षेत्रात एक टक्का जरी वाढ झाली, तरी इतर क्षेत्रातही दोन ते तीन टक्के वाढ होते. जीडीपीच्या एक टक्का दराने भारतीय शेतीने विकास साधला तर ग्रामीण भारतात त्यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होते.
    देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर येथून देशातील दुसऱ्या हरित क्रांतीची सुरुवात या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असल्याचे नमूद करुन राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरित क्रांतीच्या दिशेने केलेल्या कार्याची ओळख संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना व्हावी, तसेच कृषी क्षेत्राच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात राष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
Top