उस्मानाबाद -: जिल्ह्यातील पाणीटंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ज्या गावात व शहरात पाणी टंचाई आहे, त्या गावास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पुर्वीच्या योजनांची माहिती संबंधित अधिका-यांनी घेऊन पाणी टंचाई परिस्थितीचा गावनिहाय कृती आराखडा आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. जिल्ह्यातील पाणीटंचाई परिस्थितीचा आढावा या बैठकीत पाटील यांनी यावेळी घेतला.  उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी आणि सचिन बारवकर, नगर प्रशासन विभागाचे श्री.कुरवलकर यांच्यासह विविध तालुक्यांचे तहसीलदार, विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची  उपस्थिती होती.
      पाटील म्हणाले की, सद्यस्थितीत भूम मधील 9 गावे व 2 वाडयात, कळंब मधील 2 गावात, तर वाशी मधील 3 गावात अशा 14 गावे व २ वाडयात, 17 विहीर/बोअर अधिग्रहणाच्या माध्यमातून आणि 12 शासकीय व 5 खाजगी अशा एकूण 17 टँकरद्वारे  पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रथम शासकीय टँकरने पाणी पुरवठा करावा. कमतरता भासल्यासच खाजगी टँकरचा वापर करावा. नवीन बोअरसाठी प्रस्ताव आल्यास संबंधित तहसीलदारांनी पाहणी करुन अहवाल घ्यावा. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची  कमतरता भासणार नाही, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी याबैठकीत दिले.
         ज्या गावात टँकरने पाणी पुरवठा करावयाचा आहे. त्या गावात नळ योजना दुरुस्ती, तात्पूरती पूरक योजना, विंधन विहिर विशेष दुरुस्ती, टँकरद्वारे पाणी पुरवठा, विंधन विहीर अधिग्रहण, नवीन विंधन विहीर घेणे, बुडकी खोदणे,पाण्याचा स्त्रोत आहे किंवा पूर्वीच्या पाणी विषयक कोणत्या योजना राबविण्यात येत आहे, याची माहिती घेऊन पाहणी केल्यानंतरच आवश्यक बाबी तपासून तहसीलदार मार्फत नवीन टँकरसाठी प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. या बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती. 
 
Top