बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : राजकीय पुढार्‍यांचे फंटर गावागावात पैसे घ्या अन जयंती करा असे सांगून नाचायला लावत आहेत, शिवाजी, बाबासाहेब, आण्णाभाऊच्या नावाने नाचवले जात आहे व गरिबांच्या भाकरीचा प्रश्‍न बाजूलाच राहत असल्याचे कॉं.तानाजी ठोंबरे यांनी म्हटले.
    बार्शी नगरपरिषदेचे कंत्राटी कामगार, बार्शी टेक्स्टाईल मिलचे कंत्राटी कामगार व रेशनच्या रास्त भाव दुकानाती धान्याच्या प्रश्‍नाबाबत विविध संघटनांनी एकत्र येऊन आयटकच्या वतीने लहूल वस्ताद चौक येथून बार्शी तहसिलवर मोर्चा काढण्यात आला यावेळी ते बोलत होते.
     यावेळी कॉं.शौकत शेख, प्रविण मस्तूद, धनंजय शिंदे, बापू यमगर, विनायक माळी, संदीप गायकवाड, युवराज चव्हाण, अर्जुन शिंदे, रंगनाथ शिराळ, मॅमूना मुलाणी, लैला शेख, रमाबाई कुचेकर, राजश्री सर्वगोड, सुनिता लिंगे, रुक्साना शेख, लक्ष्मी नेवसे, वनमाला आगरकर, शारदा पंढरपूरे, महानंदा स्वामी, सुमन बोकेफोडे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार व पदाधिकारी उपस्थित होते.
   
     
  पुढे बोलतांना कॉ.तानाजी ठोंबरे म्हणाले, या पुढार्‍यांजवळ पैसा आहे पैशाने यांना सत्ता पाहिजे सत्तेच्या जीवावर यांना मस्ती करायची आहे. तेंव्हा त्यांच्या सत्तेला त्यांच्या पैशाला भुलू नका, त्यांचं शिवाजीचं प्रेम खरं नाही, शिवाजी गरिबांचा आहे. शिवाजी काय मटकेवाल्यांचा, कॉन्ट्रॅक्टर, आकडेवाल्यांचा, दहा दहा कोटी, चौदा-चौदा कोटी निवडणुकीला खर्च करणारांचा शिवाजी आहे काय? उढा करायचा असेल तर गरिबांच्या प्रश्‍नावर लढा करा, कुठलाही झेंडा घेऊन लढा करा. शिवबांच्या राज्यात राहायचं तर लढा करावाच लागेल नाहीतर काहीही मिळणार नाही, आईचं नाव घेऊन परडी पुढे केल्यासारखे शिवाजीच्या नावाने अशीच परडी फिरवली जाईल. यांचा जन्म उन्हातच आहे, आयुष्य करपले आहे, भाकरीचा प्रश्‍न खरा आहे, त्या मुलीच्या नावाला लागू नका ते देवळाचा, मशिदीची भानगड करुन भांडणे लावतात. कोणत्याही राजकिय नेत्यांवर विश्वास ठेऊ नका. पालकमंत्री सोपल यांनी फोनवर निवेदन स्विकारल्याचे सांगीतले ते आपण स्पिकरवर ऐकवले आहे. पूर्वकल्पना देऊन आलो आहोत अधिकारी जागेवर नाहीत, आम्ही कोणी उपटसूंभे म्हणून आलो नाहीत. नगरपालिका कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम सेवेत सामावून घेणे, जहॉंगिर दरबारात आलो नाहीत आणि न्याय द्या म्हणून मागायची गरज नाही आपण पाकीस्तानमध्ये नाहीत, तहसिलदारांनी लेखी द्यावे लागेल. बार्शी टेक्स्टाईल मिलने कायदे मोडले आहेत. यावेळी कामगारांनी केलेल्या उपोषणाचे ५ दिवस झाले तरी तालुका मॅजीस्ट्रेट लक्ष देत नाहीत इतके संवेदनाहिनपणे वागल्याने त्याचा खेद वाटतो. त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नाही. कामगारांचा अधिकार आहे डॉ.बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे, किमान वेतन दिले जात नाही, अनेक वर्षांपासून बोनस देण्यात येत नाही. पगारवाढ मिळत नाही. प्रोबिशन कुठल्या कायद्याने ते सांगीतले जात नाही, आमच्या मागण्या न्यायाच्या असल्यामुळेच न्यायालयाने एकतर्फी निकाल दिला आहे. आम्ही कोणाकडून हप्ता वगैरे घेतो की काय? ३५ किलो धान्य द्यायलाच पाहिले. प्रसंगी जेलभरो आंदोलन करु, काही बदल झाले असल्यास तसे जीआर द्या, दरवेळेस आश्वासने देता, धान्य मिळाले का असा प्रश्‍न उपस्थितांना केला असता अनेकांनी धान्य मिळत नसल्याची तक्रार केली. धान्य देण्यात येत नाही. या महिन्यात धान्य देण्यात येत नाही म्हणणारे हरामखोर कोण? कोण लागून गेले आहेत, लोकांच्या सामन्य मागण्या असतांनाही त्यांना आंदोलन करावे लागते ही शर्मनाम बाब आहे, आम्ही काय दारुचे दुकान हवे म्हणून मागणी करायला आलो नाही. नुसत्या आशिर्वादाने आणि चांगल्या गोष्टीने पोट भरत नाही. लोकांच्या जगण्यासाठी अन्नधान्याची गरज असते, कायद्याच्या अधिकारात असलेल्या मागण्या व तुमची जबाबदारी असतांना कोणत्याही बाबत लक्ष दिले जात नाही. माझे घर गोडाऊन जवळ आहे कोणत्या वेळेस कोणत्या गाड्या बाहेर पडतात हे मला माहिती आहे इतक्या खोलवर जायचे नाही. तो घाणेरडा धंदा आहे त्या रेशनमध्ये हात घालेल त्याच्या हाताला घाण लागते. माझ्या सहिचा अर्ज यापूर्वीच दिला होता त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आपण बघतो म्हणत म्हणत बदली होईल तर मग केंव्हा निर्णय घेणार, आम्हाला रेशन दुकानदारांशी भाडणे करुन हप्ते घ्यायचे नाहीत ते तुमचे काम आहे. जे नागरिकांचे प्रश्‍न आहेत ते लेखी व सर्वांसमोर जे सांगायचे ते सांगीतले आहे. आता उन्हात आलो आहोत पुन्हा पुन्हा या हे उत्तर कशाला देता, त्या अधिकार्‍यांना बोलवून घ्या. तीन तीनवेळेस मोर्चे झाले एका ओळीचे उत्तर नाही. आमची आम्हालाच लाज वाटत आहे परंतु आपल्याला लोकांच्या प्रश्‍नाबाबत काहीच देणेघेणे नाही. महात्मा फुले, शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवले, पेशवे आहात की काय? लेबर ऑफिसर ला बोलवून घ्या, यावेळी तहसिलदार यांनी ४ तारखेला रेशन दुकानदारांसोबत बैठक घेण्यात येईल, विविध मागण्यासंदर्भात त्याच्याशी संबंधीत अधिकार्‍यांशी बैठक लावू आणि प्रश्‍न मार्गी लावू असे आश्वावसन यावेळी तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी दिले.
 
Top