लोहारा -: भूखंडाची नोंद ग्रामपंचायतीच्या आठ अ उतार्‍यावर घेण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना येथील सरपंचाच्या पतीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवार दि. 10 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
    समद खासीम बागवान (रा. लोहरा) असे लाच घेताना रंगेहाथ पकडल्याचे नाव आहे. लोहारा     येथील ग्रामपंचायतीच्या सदस्या सुवर्णा फावडे यांच्या जाऊ सविता सिद्राम फावडे यांच्या नावे सर्व्हे नं. 145 मध्ये दोन एकर 14 गुंठे जमीन आहे. ही जमीन अनेक दिवसांपासून पडीक असल्याने त्यांनी सर्व शासकीय प्रक्रिया करून 64 प्लॉट तयार केले. या प्लॉटींगची ग्रामपंचायतच्या आठ अ उतर्‍यावर नोंद करण्यासाठी फावडे यांनी 11 नोव्हेंबरला अर्जही दाखल केला. मात्र, याबाबत नोंद करण्यास टाळटाळ केली जात होती. यामुळे ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा फावडे यांचे पती विजय चणबसप्पा फावडे यांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावाही केला. त्यांनी याबाबत सरपंच नसीमाबी बागवान, ग्रामविकास अधिकारी एस. एस. चोरमले, नव्याने पदभार स्वीकारलेले ग्रामविकास अधिकारी जे. एस. पांचाळ यांची सातत्याने भेट घेतली. मात्र काहीही उपयोग झाला नाही.
    सरपंच बागवान यांचे पती समद खासीम बागवान यांनी उतार्‍यावर नोंद करून देतो म्हणून 90 हजार रुपयांची मागणी केली. 22 जानेवारी रोजी त्यांनी 20 हजार रुपयेही घेतले. उर्वरित 70 हजार रुपये दि. 30 जानेवारी रोजी आणून देण्यास सांगितले. यामुळे फावडे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सोमवारी शिवाजी चौकातील गजानन मेडिकल येथे सापळा लावण्यात आला. तेव्हा बागवान यांनी फावडे यांच्याकडून 20 हजार रुपये घेतले. त्याचवेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक नईम हाश्मी, पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, साहाय्यक पोलिस फौजदार चंद्रकांत देशमुख, हवालदार दिलीप भगत, पोलिस नाईक सुधीर डोरले, नितीन सुरवसे, नितीन तुपे, राहुल नाईकवाडी, राजाराम चिखलीकर यांनी ही कारवाई केली.
 
Top