उस्मानाबाद -: विविध शाळा-महाविद्यालयातून एकाच वेळी निघालेली ग्रंथफेरी, वाचनसंस्कृतीचे महत्व दर्शविणारे फलक घेऊन उत्साहाने निघालेले विद्यार्थी, ग्रंथाचे महत्व सांगणारे जयघोष अशा साहित्यिक वातावरण निर्मिती करणाऱ्या ग्रंथफेरीने उस्मानाबादकरांची मने जिंकली.
      अगदी सकाळी आठ वाजल्यापासूनच आर.पी. महाविद्यालय, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), सरस्वती हायस्कूल, श्रीपतराव भोसले हायस्कूल, तेरणा महाविद्यालय याठिकाणी तेथील विद्यार्थ्यांची लगबग सुरु होती. काही ठिकाणहून सकाळी 8 वाजता तर काही महाविद्यालयातून सकाळी 8-30 वाजता या ग्रंथफेरीस सुरुवात झाली. शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक-प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना, छात्रसेना विभागप्रमुख, विद्यार्थी-विद्यार्थिनी, मराठी अभ्यास मंडळ सदस्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही ग्रंथफेरी निघाली. शहराच्या विविध मार्गावरुन आणि शहरातील नागरिकांना ग्रंथोत्सवाची माहिती व्हावी, यासाठी विद्यार्थी वाचनसंस्कृती जोपासणाऱ्या घोषणा देत होते. यामुळे ग्रंथोत्सवाची वातावरण निर्मिती होण्यास अधिक मदत झाली.
      संबंधित शाळा-महाविद्यालयांनी नियोजित मार्गाद्वारे ही ग्रंथफेरी कार्यक्रमस्थळी आली, त्यावेळी गर्दीने हा परिसर फुलून गेला. ध्वनीक्षेपकावरुन ऐकू येणारी ग्रंथोत्सवाची जाहिरात ट्यून, त्यातच विद्यार्थ्याची वाढणारी उत्सुकता आणि कुतूहलता जपत ही ग्रंथफेरी कार्यक्रमस्थळी संपली, मात्र, ग्रंथोत्सवाची वातावरणनिर्मिती करुन आणि साहित्यरसिकांना ग्रंथोत्सवाचे निमंत्रण देत !        
 
Top