उस्मानाबाद -: ग्रंथ व साहित्याने माणूसकीची जपवणूक होते. समाज जडणघडण करण्याचे काम साहित्य करते. माणूसकीचे मूल्य जोपासण्याची जबाबदारी साहित्यावर आहे. त्यादृष्टीने नवनवीन साहित्य निर्मिती होणे ही आजची गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम ग्रामीण कथाकार प्रा. भास्कर चंदनशिव यांनी  केले.
राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, साहित्य  व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव-2014 या पुस्तक प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे उदघाटन प्रा. चंदनशीव यांच्या हस्ते येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांस्कृतिक सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाडा साहित्य परिषद, उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची  व्यासपीठावर उपस्थिती होती. 
              सुरुवातीला प्रा.चंदनशीव यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी ग्रंथप्रकाशक, ग्रंथविक्रेते, विविध शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी, साहित्य संस्थांचे पदाधिकारी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती. त्यानंतर मान्यवरांनी ग्रंथोत्सवातील ग्रंथदालनाची पाहणी केली.
       ग्रंथोत्सवाचे औपचारिक उदघाटन दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. चंदनशीव म्हणाले की, ग्रंथ हे आमचे गुरु आहेत. ग्रंथाच्या वाचनामुळे माणूस घडतो. उत्कृष्ट समाज निर्मितीसाठी ग्रंथ निर्माते, साहित्यीक, व विचारवंतानी उत्कृट  दर्जेदार, वाचनीय व समाज प्रबोधनात्मक लिखाण  करुन समाज उभारणीच्या कार्यात  मोलाची भुमीका  बजावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
       सध्याच्या काळात मानवी मुल्याची जपणूक व जिव्हाळा निर्माण करणाऱ्या साहित्याची गरज असल्याचे सांगून प्रा. चंदनशीव म्हणाले की, चांगल्या ग्रंथांचे, पुस्तकांचे वाचन हे विकासासाठी आवश्यक आहे. हे ग्रंथ सर्वसामान्यांच्या मनाची भाषा बोलतात. ही भाषा अक्षराच्या माध्यमातून पोहोचविण्याचे काम ग्रंथ करतात.  साहित्य व वाचनसंस्कृतीला वाव देण्यासाठी ग्रंथाची निर्मिती महत्वाची आहे. साहित्याची परंपरा जपण्यासाठी ग्रंथाचे निरंतर वाचन महत्वाचे आहे. प्रत्येक शब्द हा संस्कृती घेऊन येतो. त्यामुळे साहित्यिक नवीन भाषा निर्माण करण्याचे कार्य करतात. ग्रंथ वाचनातून विचारांची देवाण-घेवाण वाढविण्याचे काम   ग्रंथ करीत असतात. मराठी भाषा व्यापक होण्यासाठी शब्दाचा प्रवाह महत्वाचा असतो. मराठी  संस्कृती ही विविध घटकांशी निगडीत असल्यामुळे त्याचे जतन करण्याची जबाबदारी ही आपणावर आहे, असेही प्रा. चंदनशीव यांनी नमूद केले.
      ग्रंथाविषयी वाचकांना प्रेम असते. वाचनामध्ये बरेच काही शिकण्यासारखे असते. विशिष्ट विषयाची माहितीही ग्रंथामधूनच होत असते. त्यासाठी वाचकांना ग्रंथाची खरेदी करण्यासाठी उस्मानाबादकरांना एक संधी निर्माण झाली असून वाचकांनी व रसिकांनी ग्रंथ खरेदी करुन वाचन  करुन  आपल्या ज्ञानात भर घालावी. वाचनामुळे संस्कारक्षम व विचारवंत समाजाची निर्मीती होते. तेव्हा पुस्तक व ग्रंथाचे महत्व लक्षात घेवून सर्वांनी वाचन संस्कृती जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. 
     जिल्हा माहिती अधिकारी चव्हाण म्हणाले की, हा उपक्रमाव्दारे  वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचा शासनाचा उद्देश असून  वाचकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दयावा. गतवर्षीप्रमाणे यंदाही  उस्मानाबादकर साहित्य रसिक भरभरुन प्रतिसाद देतील,अशी अपेक्षा व्यक्त करुन  त्यांनी ग्रंथप्रदर्शन आयोजनामागील भूमिका स्पष्ट  केली. ग्रंथोत्सवात  दि.4 रोजी संवाद सौमित्र शी किशोर कदम यांच्याशी दिलखुलास गप्पा, 5 रोजी कुतूहल विज्ञानाचे, आणि 6 रोजी निमंत्रितांची काव्यसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून  या प्रदर्शनात मराठवाडा तसेच राज्यातील इतर भागातून पुस्तक प्रकाशक आणि विक्रेते आले आहेत. वाचकांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेटी देऊन मोठया संख्येने याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी प्रास्ताविकात आवाहन केले
     मसापचे तावडे यांनी शासनाचा हा उपक्रम उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात साहित्यिक वातावरण अधिक वाढविण्यासाठी साह्यभूत ठरत असल्याचे नमूद केले. जिल्ह्यात अधिकाधिक साहित्य उपक्रम व्हावेत यासाठी विविध साहित्यिक संस्थांच्या सहकार्याने सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित दुरुगकर  यांनी केले तर चव्हाण  यांनी आभार मानले. या कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्ह्यातील साहितत्य रसिक, वाचक, ग्रंथप्रेमी नागरिक,  पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.                              
 
Top