उस्मानाबाद :- जिल्ह्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी आणि कॉपीमुक्त परीक्षा अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे पार पाडावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.
    येथील आर.पी. महाविद्यालयात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मंगळवार रोजी डॉ. नारनवरे यांनी बैठक घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडुकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वैजिनाथ खांडके आदी उपस्थित होते.
    बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावणात पार पाडण्यासंदर्भात तपासणी  पथके तसेच बैठे पथकात समावेश असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आज बैठक घेण्यात आली. त्यावेळी डॉ. नारनवरे यांनी मार्गदर्शन केले.
    शिक्षण विभागाने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा मिळतील, त्यांची गैरसेाय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे सांगून डॉ. नारनवरे म्हणाले की, परीक्षा केंद्र परिसरात असणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्ंलघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. परीक्षार्थी आणि संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणूक झालेले कर्मचारी  वगळता इतर कोणालाही त्यासाठी प्रवेश देण्यात येवू नये.
    कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात केंद्र प्रमुख हा महत्वाचा घटक  आहे. संबंधित केंद्रावर कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
    परीक्षा कालावधीत नियंत्रण कक्ष तात्काळ सुरु करण्याचे निर्देश त्यांनी शिक्षण विभागाला दिले. कॉपीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि अशा गोष्टींना सहकार्य करणा-यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
 
Top