बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : लोकसभा निवडणुकीचे तिकीट आपल्यालाच मिळावे याकरिता विविध प्रकारच्या क्लृप्त्या वापरतांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन व्हॉटस अॅपवरुन बदनामीने तिकीटाचा प्रयत्न होत असल्याची चर्चा उस्‍मानाबाद मतदार संघात गाजत आहे.
    लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आय यांच्या युतीवर शिक्कामोर्तब होत प्रतिस्पर्धी शिवसेना, भाजपा, आरपीआ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, यांची महायुती निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या उमेदरांची जवळपास निश्‍चिती झाली असतांना शिवसेना पक्षात मात्र अजूनही रस्सीखेच सुरु आहे. स्वत:ची लॉबी मजबूत करत यातूनच प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पदरी घोर निराशा यावी यासाठी पायात पाय घालण्याचे अनेक प्रकार सुरु आहेत. अंतर्गत प्रतिस्पर्ध्याचे तिकीट कट व्हावे याकरिता इंटरनेटचा वापर करुन काहीजण अंतर्गत गटबाजीचे दर्शन घडवत आहेत तर काहीजण फेक अकौंटद्वारे रेसमधील उमेदवाराचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. उस्‍मानाबाद मतदार संघात सध्या व्हॉटसऍपवरील पुढील मजकूर खूपच गाजत आहे.
    ''भावांनो आणि बहिणींनो रवि सरांचे तिकीट पैसे नाहीत म्हणून कटत असेल तर आपण हे लक्षात घ्या, बाळासाहेब जर असते तर, आपण सर्वजणांनी सरांना निधी जमा करुन देऊ, पण पद्मसिंह पाटलांना निवडून आणण्याचे काम अजित पवारांना करु देणार नाही''        

    सदरचा मजकूर खूप काही सांगून जातो. मागच्या इलेक्शनला थोडक्या मतांनी पराभव पत्करावा लागलेले रविंद्र गायकवाड हे तिकीटाच्या रेसमधील प्रथम स्थानावर आहेत. त्यांनी  उस्‍मानाबाद  मतदार संघातील शिवसेना पक्षाची फळी चांगली टिकवून ठेवली आहे. मोदी फॅक्टरचे वारे संपूर्ण देशात वाहू लागल्यानंतर अनेक जण आपल्याला शिवसेनेचे तिकीट मिळाले तर मोठ्या मतांनी व विना खर्चाचे निवडून येऊ या आशेने शिवसेनेत आले. खोट्या गप्पा रंगवून आपण कट्टर शिवसैनिक असल्याचे भासवू लागले. काही जण तर केवळ आपल्याकडे इतके पैसे आहेत इतके खर्च करु शकतो अशा चर्चा रंगत आहेत. 
    सदरच्या मजकूराबाबत रविंद्र गायकवाड यांच्याशी चर्चा केली असता आपण अशा प्रकारचा कोणताही संदेश देण्याचे कारणच नाही, अशा प्रकारे आपली व आपल्या पक्षाची बदनाही कोणीही करु शकते आपल्या पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर आपला विश्वास आहे, त्यांचाही आपल्यावर विश्वास आहे. त्यांनी देईल तो उमेदवार आम्हाला मान्य आहे. मी पक्षासाठी काम करणारा माणूस आहे. सर्व जनतेला या गोष्टी माहिती आहेत. खोट्या अकौंटद्वारे अथवा स्वत:च्या स्वार्थासाठी कोणी अशा मजकूराचा वापर करीत असेल तर जनतेला माझे आवाहन आहे त्यांनी या गोष्टींवर विश्वास ठेवू नये असेही रविंद्र गायकवाड यांनी सांगीतले.
 
Top