उस्मानाबाद :- केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांपर्यंत जाईल, यादृष्टीने तात्काळ पाठपुरावा करण्याचे निर्देश खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी दिले.
       जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक खासदार डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज झाली. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांची यावेळी उपस्थिती होती.
विविध योजनांची कामे अपूर्ण दिसत आहेत. संबंधित यंत्रणांनी त्याची नोंद घ्यावी, केंद्र शासनाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांपर्यंत ती योजना पोहोचली पाहिजे, अशा सूचना यावेळी खा. डॉ. पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिल्या.
      यावेळी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, इंदिरा आवास योजना, पाणलोट विकास कार्यक्रम, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, भूमी अभिलेख्यांचे संगणकीकरण, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रम, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, आम आदमी विमा योजना आदी केंद्र अर्थ साहाय्यीत योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा यावेळी घेण्यात आला.
     विविध पंचायत समित्यांचे सभापती,  योजनांशी निगडीत विविध यंत्रणांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.  
 
Top