उस्मानाबाद :- जिल्ह्यात होणारी निवडणूक मुक्त व शांततेच्या वातावरणात व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून राजकीय पक्षांनीही निवडणूकीतील आदर्श आचारसंहितेनुसार कार्यवाही केल्यास हे प्रयत्न सफल होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. निवडणूक आयोगाच्या विविध आदेश, परिपत्रक व निर्देशासंदर्भातील कायदेशीर माहिती  राजकीय पक्षांना हवी असेल तर त्या कायदेशीर बाबींच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र  लीगल सेल सुरु करण्यात येईल जेणेकरुन निवडणूक आयोगाच्या कोणत्याही आदेशाबाबत संबंधितांमध्ये संभ्रमावस्था राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
       येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार रोजी डॉ. नारनवरे यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणूक पूर्वतयारीसंदर्भात बैठक घेतली. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) बी.एस चाकूरकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी डॉ. नारनवरे यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या निवडणूक पूर्वतयारीची माहिती संबंधितांना दिली. मतदार जनजागृतीसाठी प्रशासनाने विविध पातळीवर वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे जागृती करण्याचा प्रयत्न केला. राजकीय पक्षांनीही आपल्या मतदार प्रतिनिधींना याबाबत जागरुकता वाढवून मतदारांपर्यत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले.
     आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्याच्या संकेतस्थळावर निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनी त्या माहितीचा उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रचार काळात घ्यावयाच्या विविध मान्यता, घ्यावयाची काळजी, स्टार प्रचारकांची नावे वेळेत कळविणे आदींबाबतही त्यांनी या प्रतिनिधींना अवगत केले.
      निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्या रविवारी मतदान केंद्रांवर मतदार यादीचे वाचन करण्यात येईल. याठिकाणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही उपस्थित राहिल्यास  नंतर होणारी गैरसोय टाळता येईल, असे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.
       त्यानंतर, डॉ. नारनवरे यांनी निवडणूक विषयक विविध कक्षांच्या प्रमुखांचीही बैठक घेतली.
       निवडणूक विषयक कामांसाठी एक मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येकाने निवडणूक विषयक कामे गांभीर्याने पार पाडावीत. कोणत्याही प्रकारे हयगय झाल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. समन्वय साधून कामे केली तर कामे सोपी होतील. त्यादृष्टीने नियोजन करावे. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी संबंधितांनी वेळेत आणि बिनचूकपणे पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
        कायदा व सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कार्यवाही, आवश्यक व पुरेसा पोलीस बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्र असतील तर त्याठिकाणी घ्यावयाची काळजी याबाबतही आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
 
Top