पांगरी (गणेश गोडसे) :- प्रत्येक गावाची ओळख ही त्या त्या गावात चालणारे व्यवसाय स्वयंरोजगार व स्थानिक उदयोग धंदयावर होत असते. घारी (ता. बार्शी) या गावाची पिवळं सोनं पिकवणार गांव अशी असलेली ओळख पुसट होउन अलिकडील काळात लक्ष्मीचे (केरसुनी) गांव अशी नविन ओळख परिसरातील पाच-सहा जिल्हयात होऊ लागली आहे. घारी येथील एका मोठया श्रमजीवी समुहाने संघटितपणे व्यवसाय करून योग्य बाजारपेठ उपलब्ध झाल्यास कसा कायापालट घडु शकतो याचे आदर्श उदाहारण समोर ठेवले आहे.
    काळ बदलतोय जग 21 व्या शतकात प्रवेश करून स्थिरावलेले आहे. मात्र पुरातन काळापासुन भारतीय संस्कृतीमध्ये केरसुनीला असलेला सन्मान आजही टिकुन आहे. वेळे काळानुसार केरसुनिच्या आकारात प्रकारात व निर्मितीच्या कच्च्या मालात आमुलाग्र बदल होत असला तरीही जुन्या पदधतीच्या गावठी केरसुन्या आजही घरोघरी विशेषताः ग्रामीण भागात आपले अस्तीत्व टिकवुन आहेत.
    घारीत पारंपारिक केरसुन्यांची मोठी निर्मितीः गावठी केरसुन्यांना असलेल्या मागणीचा विचार करता घारी येथील ज्योतिबाच्या माळाशेजारील वस्तीत तयार होणा-या सिंदोळयांच्या केरसुन्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मागणी असली तरीही येथील उत्पादकांना बाजारपेठेशी व इतर सुधारीत उत्पादकांशी मोठी स्पर्धा करून बाजारपेठेत टिकावे लागत आहे. मात्र काही ठराविक वर्गांची अशा केरसुनिंना मागणी असल्यामुळे हा व्यवसाय तग धरून आहे. घारीत असलेले लघुउदयोजक हे आंधप्रदेश, कर्नाटक आदी परराज्यातुन केरसुन्यांची निर्मिती करण्यासाठी लागणारा कच्चा माल शिंदोळयांची ट्रकने मागणी करतात. पारंपारीक केरसुन्यांची निर्मिती करण्यासाठी विशेषतः शिंदोळयांच्या फांदयांची आवश्यकता असते व शिंदोळयांची झाडे ही शक्य तो नदी, ओढा यांच्या काठावर व पाण्याच्या ठिकाणीच आढळुन येतात. मात्र अलिकडील काळात निसर्गाच्या लहरीपनामुळे पर्जन्यमानाचे प्रमाण खुपच कमी झाल्यामुळे शिंदोळयांच्या झाडांची संख्याही खुपच कमी झालेली पहावयास मिळते. परिणामी केरसुन्यांच्या निर्मितीमधील कच्चा माल मिळणे जिकीरीचे होऊन बसले आहे. त्यामुळे या उत्पादकांना कच्चा माल मिळवताना खुपच कस्ता खाव्या लागत आहेत. शासन तर या लोकांच्या प्रश्‍नाकडे साधे बघण्यासही तयार नसुन हा व्यवसाय तग धरणार का? आगामी काळात हा व्यवसाय लुप्त होणार? हे येणारा काळच सांगणार आहे.
 
Top