पंढरपूर :- विविध विकास कामाव्दारे सोलापूर जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलला जाईल. विकास कामासाठी पैसा कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
    पंढरपूर येथे विविध विकास कामाच्या शुभारंभा नंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आ.भारत भालके, माजी  राज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा श्रीमती उज्ज्वला भालेराव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात आघाडी शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली. भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले. 2/3 वर्ष पाऊस न झाल्यामुळे होरपळलेल्या जनतेला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला. छावणी मध्ये सुमारे 10 लाख जनावरे सांभाळली, सुमारे साडे पाच हजार टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर सिमेंट बंधारे निर्माण करण्यात आले. शासकीय यंत्रणा ,स्वयंसेवी संस्था, विविध संस्था, लोकसहभागाव्दारे विविध प्रकल्पातील गाळ मोठ्या प्रमाणवर काढून पाणीसाठा वाढविण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
    राज्यात शाश्वत सिंचनाचे क्षेत्र वाढले पाहिजे. जेथे पाणी नाही तेथे पाणी पोहचविले पाहिजे. यासाठी विविध उपाययोजनाव्दारे प्रयत्न केले जात आहेत. 100 कोटी झाडे लावण्याचा निर्धार करुन त्याची अंमलबजावणी केली जात आहे. दुष्काळी भागाला पाणी मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांतील जनतंच्या भवितव्यासाठी सिंचनाबाबतचा निर्णय घेतला जाईल. सांगोला-मंगळवेढा तालुक्यासाठी जास्तीत-जास्त निधी उपलब्धतेसाठी  सकारात्मक प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी दिली.
    सोलापूर येथे नविन विमानतळ होत आहे. जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुक यावी, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे आदी विकास कामाव्दारे जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलला जाईल. तसेच चतु:जन्म शताब्दी आराखडा पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.पंढरपूर येथील उपजिल्हा न्यायालयासाठी निधी देण्यात येईल, पंढरपूर येथे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय होण्यासाठी अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल.त्याप्रमाणे पंढरपुर येथे कृषी महाविद्यालय स्थापनेसाठी पुढील  अर्थसंकल्पाच्या वेळी निर्णय घेतला जाईल. यासाठी जागेची निश्चिती करावी असे सांगुन मुख्यमंत्री चव्हाण यांनी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध निर्णयाची माहिती दिली.
    याप्रसंगी  सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, समाजातील उपेक्षित वर्गाला ‍ शिक्षणाचे दालन ज्यांनी खुले केले. त्या क्रांती-सूर्य महात्मा फुले यांच्या पुतळयाचे अनावरण झाले आहे. तसेच पशुचिकात्सलयाच्या नुतन इमारतीचे उदघाटन झाले. आदी विविध कामाव्दारे शासन पंढरपूरच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
    यावेळी आ.भारत भालके यांनी म्हैसाळ योजनेच्या टप्पा 6 चे काम लवकर पुर्ण व्हावे, पंढरपूर येथे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजुरी मिळावी पंढरपूर येथे कृषी महाविद्यालय व्हावे, पंढरपूर येथील उप- जिल्हा न्यायालयाच्या अपुर्ण इमारत पुर्ण करण्यासाठी निधी देण्यात यावा, मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या सिंचनाच्या योजना मार्गी लावाव्यात आदी मागण्या केल्या.
     या प्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण  करण्यात आले.   
     यावेळी नगराध्यक्षा श्रीमती उज्ज्वला भालेराव, ओ.बी.सी.सेलचे अध्यक्ष बापुसाहेब भुजबळ, समता परिषदेचे बाळासाहेब माळी आदींची समोयोचित भाषणे झाली.
    या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे, कल्याणराव काळे, बाळासाहेब शेळके, प्रकाश पाटील यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
Top