नळदुर्ग :- नगरपालिकेच्‍यावतीने केंद्र शासनाच्‍या आयएचएसडीपी योजनेंतर्गत सन 2006 साली घरकुल योजना राबविण्‍यात आली. मात्र ते अद्याप पूर्ण झाले नाही. लाभार्थ्‍यांना त्‍वरीत घरकुल मिळावे, लोकवाटा दहा टक्‍केच असावा, योजनेत गैरप्रकार करणा-यांविरुद्ध कडक कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवार रोजीपासून भाजपाच्‍यावतीने नळदुर्ग नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरु आहे. दरम्‍यान, या उपोषणाची वरिष्‍ठ पातळीवरुन कोणीही दखल न घेतल्‍याने आज दि. 21 फेब्रुवारी रोजी दुस-या दिवशीही उपोषण सुरुच होता. हे आमरण उपोषण भाजपाचे नळदुर्ग शहराध्यक्ष पद्माकर घोडके व मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष सुशांत भुमकर यांनी केले आहे.   
    नळदुर्ग पालिकेला २००८ मध्ये १२०६ घरकुलांच्या बांकामाची एक महत्वाकांक्षी योजना मंजूर झाली होती. या योजनेसाठी २२ कोटी रुपये निधीची तरतूद केलेली आहे. गरजू तसेच गोरगरिबांसाठी अत्यंत लाभदायी व महत्वाची ही योजना आहे. परंतु आतापर्यंत १० कोटी रुपये निधी खर्च होऊनसुद्धा सदरील योजनेचे काम सहा ते सात वर्षांपासून अर्ध्‍यातच रखडून पडले आहे. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी योजनेसाठी लोकवाट्याची रक्कम भरलेले शेकडो लाभार्थी हक्काचे घर मिळणार का, या आशेवर बसलेले आहेत. परंतु लाभार्थ्‍यांना घरकुले मिळण्याची आशा मावळत चालली आहे.
    प्रशासनानेही योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे कबूल करून पालिकेच्या तत्कालिन दोन नगराध्यक्षांसह चौघाजणांना याप्रकरणी दोषी ठरविलेले आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणावरही कारवाई झालेली नाही. राजकीय दबाबामुळेच दोषींवर कारवाई होण्यास विलंब आणि टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होत आहे. घरकूल योजनेतील लाभार्थ्‍यांना घरकुले त्वरीत मिळावीत, योजनेतील लाभार्थ्‍यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे न घेता, शासनाच्या नियमानुसार १० टक्केच लोकवाटा घेण्यात यावा आणि या योजनेतील भ्रष्टाचा-यांवर त्वरीत उचित कारवाई केली जावी, या मागणीसाठी भाजपा पदाधिका-यांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
    जि.प. सदस्‍य कैलास शिंदे, भाजपाचे उमरगा तालुकाध्‍यक्ष सतीश साळुंके, जिल्‍हा सरचिटणीस दत्‍ता राजमाने, संताजी चालुक्‍य, प्रभाकर मुळे, अॅड. अनिल काळे, तालुकाध्‍यक्ष विजय शिंगाडे यांनी भेट दिली. या उपोषणास माजी नगरसेवक दिलीप कुलकर्णी, सचिन डुकरे, शब्‍बीर कुरेशी नगरसेवक देविदास राठोड, माजी नगराध्‍यक्ष दत्‍तात्रय दासकर, जिल्‍हा नियोजन समितीचे सदस्‍य शिवाजीराव मोरे, पं.स. सदस्‍य साहेबराव घुगे, जिंदावली शेख, डॉ. सतीश डुकरे, कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्‍यक्ष विनायक अहंकारी यांच्यासह घरकूल योजनेतील लाभार्थी खय्युम कुरेशी, गुलाब बागवान, विजय अवचार, सलीम शेख, शब्बीर शेख, अमर नदाफ, फक्रोद्दीन शेख, रजिया शेख, सुनिता कांबळे, दीपमाला देडे, गोवर्धन आतकरे, आरीफ शेख, निसार शेख, अमिना शेख, अनिसा शेख यांच्‍यासह सव्‍वाशे जणांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
 
Top