उस्मानाबाद : रुई, ता. बार्शी, जि. सोलापूर येथील सौ. छाया सुरेश हंडीबाग यांच्या शेतातील दि. २३ फेब्रुवारी रोजी ठिबक सिंचन साहित्य व शेळ्यांची पिल्ले चोरणा-यास आरोपीस दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद करून ९४ हजार १५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
    रूई ता. बार्शी जि. सोलापूर येथील शेत वस्तीवर राहणा-या सौ. छाया सुरेश हंडीबाग यांच्या शेतातील सालगडी छाया हंडीबाग यांच्या ३५ शेळा नेहमीप्रमाणे दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास शेतातील शेडमध्ये बांधुन जेवण करून झोपी गेला होता. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी छाया हंडीबाग यांच्या सालगड्याच्या घरास बाहेरून कडी लावून रात्री २ वाजण्याच्या सुमारास ३५ शेळ्यापैकी १० शेळ्यांची पिल्ले तसेच ठिबक सिंचन लॅटरचे १२ बंडल व ९ प्लॅस्टिकचे पी. व्ही. सी. पाईप केबल वायर असा एकूण १ लाख ६० हजाार ७०० रूपयांचा माल चोरून नेहला होता. या चोरीचा वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
    उस्मानाबाद येथील दरोडा प्रतिबंधक पथक हे या चोरीच्या मालाविषयी तसेच घडलेल्या गुन्ह्यातील चोरांचा शोध घेत असताना त्यांना खब-यामार्फत त्यांना माहिती मिळाली की, गावसुद येथील राहणारा मोतीराम रघु पवार याने त्याच्या साथीदारासोबत कोठून तरी ठिबक सिंचनाचे लॅटर तसेच शेळ्यांची पिल्ले शासकीय गायरानात आणून ठेवली आहेत. या मिळालेल्या माहितीवरून पोलिस अधिक्षक सचिन पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक एम. डी. गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोहेकाँ. मधुकर घायाळ, तानाजी माळी, मोईज काझी, सुनिल कोळेकर, प्रफुल्ल ढगे, काका शेंडगे यांनी गावसुद शिवारात छापा टाकून आरोपी मोतिराम रघु पवार रा. गावसुद यास पकडून दहा शेळ्यांची पिल्ले, केबल वायर, पाईप, ठिबक सिंचन लॅटरचे १२ बंडल असा एकूण ९४ हजार १५० रूपयांचा माल जप्त केला. आरोपी मोतिराम रघु पवार यास ताब्यात घेऊन पुढील तपास कामी पोलिस ठाणे वैराग यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
 
Top