उस्मानाबाद :- राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उस्मानाबाद तालुक्यातील तुळजापूर मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 72 गावांत विकास पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. नागरिकांनीही या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
       उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा, भंडारी आणि धुत्ता येथे विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच उदघाटन पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी शासन योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
          पाटोदा येथे साडेपाच लाख रुपये खर्चाच्या सभागृह बांधकामाच्या कामाचा भूमीपूजन समारंभ ना. चव्हाण यांच्या हस्ते झाला. जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सरडे, नितीन बागल, धनंजय रणदिवे, दत्ता सोनटक्के, सिद्धार्थ बनसोडे, बालाजी आदटराव, त्र्यंबक सुरवसे, सुरेश पवार, अरुण कोळगे, उफसरपंच अरुण निलंगे, ज्ञानदेव राजगुरु, रामकृष्ण गवळी, विनायक राजगुरु, नझीर शेख, आदींची यावेळी उपस्थिती होती.
      पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, अडचणीच्या काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याचे काम राजय् शासनाने केले आहे. खरीप व रब्बी हंगामात पीके वाया गेल्याने राज्य शासनाकडून अनुदान देण्यात आले. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरु केली. राज्य स्तरावर पाठपुरावा करुन निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान मिळण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीतूनही गावासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
     अन्न सुरक्षा योजना आणि राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गरजूंना मदत करण्याचा उद्देश सफल होणार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.
        सरडे यांनी, विविध प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चव्हाण हे सतत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
      भराडी येथे पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते रस्त्याचे भूमीपुजन करण्यात आले. सरपंच नामदेव वाळके, चंद्रकांत शिंदे, संतोष जाधव, दयानंद एडके, प्रमोद सूर्यवंशी, शाहूराज शिंदे, हणमंत पाटील, सुधाकर सूर्यवंशी, शैलेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 
         मागील टंचाई परिस्थितीत पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले. कमी पाऊस झाल्याने यावर्षीही टंचाई जाणवत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
       धुत्ता येथे पालकमंत्री चव्हाण यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून बांधण्यात आलेल्या धुत्ता मुख्य रस्ता ते नेहरुनगर मस्जिद या 6 लाख रुपये खर्चाच्या कामाचे उदघाटन करण्यात आले.  विविध मागण्याचे निवेदन यावेळी पालकमंत्री चव्हाण यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. परमेश्वर शिंदे व त्यांचे सहकारी आदींची यावेळी उपस्थिती होती.
 
Top