उस्मानाबाद :- जिल्ह्यातील गरीब कुटूंबांना पुरेशा प्रमाणात आणि पोषणमूल्य असलेले अन्न मिळावे यासाठी अन्न सुरक्षा योजना उपयुक्त ठरेल. मात्र, संबंधित लाभार्थीपर्यंत या योजनेचा लाभ संपूर्णपणे जाईल, यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सयव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
    जिल्ह्यातील अन्न व अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम -2014 चा शुभारंभ उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे आणि तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे  श्री.चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील हे होते. वाघोली येथील कार्यक्रमास आमदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हजारे, अप्पासाहेब पाटील, ब्रिजलाल मोदाणी, लक्ष्मण सरडे, सुरेश देशमुख, दगडू धावारे, धनंजय रणदिवे, शीला उंबरे, स्मिता ननवरे, बाळासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे,  तहसीलदार सुभाष काकडे आदींची उपस्थिती होती.
    काक्रंबा येथील  कार्यक्रमास अप्पासाहेब पाटील, ब्रिजलाल मोदाणी, सुरेश देशमुख, पंडिच जोकार, धीरज पाटील, महेंद्र धुरगुडे, काशीनाथ बंडगर, श्रीमती घोडके, अच्युत वाघमारे, गोकुळ शिंदे, अशोक मगर, प्रकाश चव्हाण, सरपंच कविता घुगरे, हरिभाऊ काळदाते, तहसीलदार एन.बी.जाधव आदींची उपस्थिती होती.
     पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, राज्यात 31 जानेवारी रोजी या योजनेचा शुभारंभ झाला. प्रत्येक जिल्ह्यात आजपासून ही योजना राबविण्यास सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील 16 लाख 57 हजार लोकसंख्येपैकी 11 लाख 77 हजार लोकसंख्येला या अन्न सुरक्षा योजनेचा फायदा होणार आहे. गरीब नागरिकांसाठी ही अतिशय चांगली अशी योजना आहे. योग्य नियोजन करुन संबंधितांपर्यंत हे धान्य पोहोचावे, यात कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.
       राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे सांगून पालकमंत्री चव्हाण यांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे उदाहरण दिले. आजाराने पीडित गरीबांना महागडे उपचार परवडत नाहीत यासाठी या योजनेच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे, असे सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतींना या योजनेची माहिती व लाभार्थी निकष याबाबतचा फलक लावण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले.
संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान, नरेगाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासाची कामे, टंचाई परिस्थितीत पाणीटंचाई जाणवू नये यासाठी घेतलेल्या उपाययोजना अशा माध्यमातून ठिकठिकाणी पुष्कळ कामे केल्याचे त्यांनी सांगितले.
खा. डॉ. पाटील यांनी अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले. भरडधान्य, गहू, तांदूळ अगदी माफक दरात गरीबांपर्यंत पोहोचविण्याचा आणि त्यांना अन्न सुरक्षा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
आमदार ओमराजे निंबाळकर यांनी ही योजना अतिशय चांगली असून पुरवठा पद्धतीत पारदर्शकता आणल्यास सर्वसामान्य गरीब नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी कुपोषण कमी करण्यासाठी आणि अन्नाची भ्रांत मिटवण्यासाठी ही योजना उपयुक्त असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक श्री. मिराशे यांनी केले.
        वाघोली (ता. उस्मानाबाद)  आणि काक्रंबा (तुळजापूर) येथील कार्यक्रमास नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top