नळदुर्ग :- येथील बसस्‍थानकासमोर राष्‍ट्रीय महामार्गावर बुधवार रोजी दुपारी बारा वाजता महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍यावतीने विविध मागण्‍यांसाठी रास्‍ता रोको आंदोलन करण्‍यात आले. हे आंदोलन नळदुर्ग शहराध्‍यक्ष जोतीबा येडगे यांच्‍या नेतृत्‍वाखाली करण्‍यात आले. मनसे कार्यकर्त्‍यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्‍यान रास्‍ता रोकोमुळे महामार्गाच्‍या दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती.
महाराष्‍ट्रातील सामान्‍य जनतेकडून राज्‍य सरकारच्‍या आशिर्वादाने अवैध व आवाजावी टोल वसुलीचे काम जोरात चालु आहे. काही टोल नाक्‍याची मुदत संपून देखील टोलनाक्‍यातून टोलची वसूली केली जात आहे. तिथे गोळा होणारा पैसा कुठे जातो, राज्‍य सरकार तर्फे जे काही निकष लावण्‍यात आलेल्‍या आहेत. ते अत्‍यंत चुकीचे आहेत. त्‍यामुळे सर्व सामान्‍य जनता वेटीस धरली जात आहे. सरकारने यावर गांभिर्याने विचार करावा व टोल नाक्‍यांचा अनागोंदी कारभार थांबवावा.
    असे अनेक टोलनाके आहेत की, नियम असून सुध्‍दा स्‍वच्‍छतागृह, पिण्‍यासाठी पाणी, प्रवाशांसाठी निवासी खोली अशा अनेक सुविधा पुरविण्‍याच्‍या अटी असूनसुध्‍दा पुरविल्‍या जात नाहीत. पण दंडमशाही करुन टोलची वसुली मात्र केली जाते. सुविधा न पुरविण्‍यावर कडक कार्यवाही व्‍हावी, राज्‍य सरकारचे टोल विषयीचे जी धोरण आहे ते बघता असे वाटते की, राज्‍यकर्ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याविषयी नवीन धोरणात्‍मक बदल केले तर त्‍यांना चरण्‍यासाठीचे कुरुण बंद होईल. अशी भिती या राज्‍यकर्त्‍यांना वाटत असून यांच्‍या ऐश-आरामासाठी लागणारा पैसा मिळणे बंद होईल. राज्‍य सरकारने सर्व टोलनाक्‍याचे प्रत्‍येक महिन्‍याला ऑडिट करण्‍याचे आदेश द्यावे व टोलच्‍या व्‍यवहारात पारदर्शकता आणावी.
    एकूणच परिस्थिती बघता राज्‍य सरकारने या टोलच्‍या माध्‍यमातून जे सामान्‍य जनतेची पिळवणूक आणि लुट करीत आहेत. ते कुठेतरी थांबायला हवे. म्‍हणून या विरोधात राज ठाकरे यांच्‍या आदेशानुसार महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने ''झोपेचे सोंग'' करीत असलेल्‍या सरकारला जागे करण्‍यासाठी रास्‍ता रोको आंदोलन करण्‍यात येत असल्‍याचे अनेकांनी सांगितले.
    या आंदोलनात मनसेचे जिल्‍हा सचिव अमरराजे कदम, तुळजापूर तालुकाध्‍यक्ष शाम माळी, तुळजापूर शहराध्‍यक्ष राजेश मलबा, नळदुर्ग शहराध्‍यक्ष जो‍तिबा येडगे, परिवहन जिल्‍हा उपाध्‍यक्ष बशीर शेख, शहर उपाध्‍यक्ष रमेश घोडके, अलीम शेख, गौस कुरेशी, शिवाजी चव्‍हाण, दत्‍तात्रय धारवाडकर, अरुण जाधव, प्रवीण राठोड, माजी तालुकाध्‍यक्ष राजकुमार कोरेकर, तानाजी खराटे  यांच्‍यासह कार्यकर्ते मोठ्या संख्‍येनी सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी आपल्‍या भाषणातून शासनाविरूद्ध टिका केली. यावेळी मागण्‍यांचे निवेदन मंडल अधिकारी माणिक पवार यांनी स्विकारले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्‍ठा घारगे वालवलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, प्रकाश गायकवाड आदीजण उपस्थित होते.
 
Top