नळदुर्ग :- भरधाव अज्ञात वाहनाच्‍या धडकेत मोटारसायकलस्‍वार जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्‍याची घटना सोलापूर-हैद्राबाद राष्‍ट्रीय महामार्गावरील अणदूर (ता. तुळजापूर) शिवारातील देशमुख कोट्यानजीक बुधवार दि. 12 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.
    लक्ष्‍मण नारायण जवान (वय 25 वर्षे, रा. खानापूर, ता. तुळजापूर) असे अपघातात जागीच ठार झालेल्‍या मोटारसायकलस्‍वाराचे नाव असून रोहन दत्‍तात्रय धुते (वय 12 वर्षे), लायव्‍वा कागे (वय 65 वर्षे) असे गंभीर जखमी झालेल्‍यांचे नावे आहेत. तुळजापूर तालुक्‍यातील खानापुर येथून बुधवार रोजी दुपारी मोटारसायकल क्रमांक एम.एच. 25 ए.ए. 3263 यावर वरील तिघे स्‍वार होऊन नळदुर्गमार्गे आष्‍टा गावाकडे जात असताना राष्‍ट्रीय महामार्गावरील अणदूर गावाजवळ देशमुख कोट्यानजीक एका भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्‍यात मोटारसायकलस्‍वार लक्ष्‍मण जवान हा जागीच ठार झाला. अन्‍य दोघेजण जखमी झाले. जखमींना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. या घटनेची नळदुर्ग पोलिसात नारायण बलभीम जवान यांनी फिर्याद दिल्‍यावरुन अज्ञात वाहनाचालकांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड हे करीत आहेत.
 
Top