बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : निवडणुका डोळ्यासमोर ठेवत केंद्रातील कॉंग्रेस सरकारने जाहीर केलेल्या फसव्या अन्नसुरक्षा योजनेतील धान्याने गरिबांचे पोट कसे भरेल त्यापेक्षा गुन्ह्यातील शिक्षा भोगणार्‍या कैद्याला मुबलक आहार देण्याची तरतूद आहे. याचा निषेध करण्यासाठी आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या बार्शी शाखेच्या वतीने तहसिलसमोर शासनाच्या विरोधात दि.२४ रोजी मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एल.बी.शेख यांनी दिली.
    शासनाने अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करुन घेतलेल्या निर्णयात दारिद्रय रेषेखालील नागरिकांना प्रतिमानसी धान्य ३ किलो गहू, २ किलो तांदूळ , ३०० मिली केरोसीन, २५० ग्रॅम साखर महिनाभरासाठी देण्यात येत आहे. त्यानुसार दररोज १०० ग्रॅम गहू, ७५ ग्रॅम तांदूळ इतक्या धान्यातून पोट भरता येणार नाही व उपासमारच होणार आहे. तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार करदात्या नागरिकांना क्लेशदायक आहे. भ्रष्टाचार व महागाई प्रचंड वाढविण्यात आल्याने अगोदरच सामान्य जनता त्रासली आहे. प्रत्येक वस्तूच्या किमती आकाशाला भिडल्या असतांना गुन्हे करणार्‍या कैद्यांना मात्र सकाळच्या नाट्याला २५० ग्रॅम उपीट, पोहे अथवा लाफशी एक फळ. दुपारच्या भोजनात ६०० ग्रॅम वजनातील तीन भाकरी, २ भाज्या, भात, कांदा व फळ, १०० मिली. दूध अथवा दही. रात्रीच्या जेवणात ६०० ग्रॅम वजनातील तीन भाकरी, २ भाज्या, भात, कांदा व फळ. आठवड्यातून एक वेळेस मांसाहार अथवा गोड जेवणाची तरतूद करण्यात आली आहे. कैद्यांना सर्व पदार्थ शिजवून जागेवर पोहोच देण्यात येतात. प्रतिमानसी किमान ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, २ लिटर केरोसीन, ७५० ग्रॅम साखर, पामतेल इत्यादी धान्य आवश्यक आहे. याच जिल्ह्यातून केंद्रीय कृषिमंत्री यांना निवडून दिले असतांना मागील कित्येक महिन्यांपासून पामतेलचे वितरण बंद आहे, नेमके कोणाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकार चालत आहे हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. प्रत्येक वस्तूवर कर भरणार्‍या सामान्य नागरिकांना मात्र जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या धान्याची सोय देखिल नीटपणे करता येत नसल्याने शासनाचा धिक्कार करत असल्याचे एल.बी.शेख यांनी सांगीतले.
 
Top