बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मी देखील या संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. आज तुम्ही जिथे बसले आहात त्या ठिकाणी मी देखील यापूर्वी बसलो होतो परंतु त्यावेळी माझ्यावर स्व.जगदाळेमामांचे संस्कार होते व आजही आहेत असे म्हणत नामदार दिलीप सोपल यांनी शालजोडे मारले.
     शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व इतर काहीमधील बसलेल्या थिल्लर प्रवृत्तीच्या व्यक्तींनी अगोदर ठरवून कार्यक्रमात व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने तसेच निमंत्रीत पाहुण्यांना अपमानीत करण्याच्या वाईट हेतुने कुत्सीत प्रवृत्तीने प्रेरीत होऊन शिट्या आणि विशिष्ठ सुर देण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी सोपल यांनी शालजोडे मारले.
     स्वर्गीय जगदाळे मामा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी संस्थाचालकांनी स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी आग्रह करुन निमंत्रीत केलेले राष्ट्रवादी पक्षाचे नामदार दिलीप सोपल, नामदार जयंत पाटील, खासदार पद्मसिंह पाटील तर सध्याचे कॉंग्रेसचे व पूर्वीचे शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी खासदार शिवाजी कांबळे हे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी हा प्रकार घडला.
     स्वर्गीय जगदाळे मामा हे त्यांच्या कार्याने मोठे होते, त्यांनी चांगले संस्कारच घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु त्यांच्या पश्चात त्यांच्या चांगल्या संस्कारांचा वारसा जतन करण्यास संस्थेतील संचालक कमी पडत असल्याचे चित्र या प्रकारावरुन दिसून येते. दिशाहिन व भरकटलेल्या विचारांची पिढी या संस्थेत निर्माण होत असल्याचे विदारक दृश्य अनेक प्रसंगात पहावयास मिळत आहे असा प्रश्न निर्माण होत असून हे वास्तव दुर्लक्षून चालणार नाही. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात संस्काराचे बिजारोपण करण्याचा मुख्य उद्देश केंव्हाच बाजूला गेला आहे आणि त्या ठिकाणी स्वहित अथवा सुस्पष्ट व्यावसायिक हेतूचे चित्र गडद होत असल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. हे बिनबोभाट सुरु असलेल्या शिकवण्यांच्या तक्रारीवरुन दिसून येते. सिमेंट कॉंक्रीटच्या इमारतींचा विकास हाच विद्यार्थ्यांचा विकास असा समज काही जणांचा झाला असेल तर बाहेरच्या जगात या गोष्टींना काहीच किंमत नाही हे अगोदर ध्यानात घ्यायला हवे.
     या प्रसंगी सोपल यांनी काही क्षणातच पूर्वगृह दूषितांना उघडे केले आहे. राजकीय क्षेत्रात पुढील वाटचाल सुरु ठेवतांना ना.सोपल यांना संस्थेतील सुरु असलेल्या अंतर्गत राजकिय वातावरणाचे दर्शन अल्पशा वेळेत झाले आहे. पुढे वेगळे बोलणारे पाठीमागे काय चर्चा करत आहेत आणि कोणती राजकिय दिशा व शिक्षण दिले जाते याचा उलगडा या निमित्ताने होत आहे.
 
Top