बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : आपण केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पक्ष आपली उमेदवारीची घोषणा करेल.  माझी लढत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधात राहील, काही अपरिहार्य कारणास्तव महायुतीचे तिकीट मिळाले नाही तरी जनतेचा उमेदवार म्हणून धाराशिव मतदारसंघासाठी उभे राहणार असल्याचे रोहन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
     सोमवारी बार्शीतील शासकिय विश्रामगृहात ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सतिश आरगडे, लोकमंगल उद्योग समुहाचे शिवाजी पाटील, लोकमंगल पतसंस्था समन्वयक नवनाथ भोसले, भाजपा तालुका अध्यक्ष जयंत पाटील, समाधान पाटील, आदी उपस्थित होते.
     देशमुख म्हणाले, आपण आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचे काम केले असून शिवसेना-भाजपा-आर.पी.आय.(ए)-स्वाभिमानी शेतकरी संघटना या महायुतीमधून वरिष्ठांकडे धाराशिव मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. लोकमंगल उद्योग समुहाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून विकासाचे काम सुरु केले व त्यांच्या अडचणी सोडिवल्या आहेत. विविध सामाजिक कार्य करतांना लोकांशी जवळीक निर्माण झाली असून जनतेने आपल्या उमेदवारीची मागणी केली आहे. आजपर्यंत धाराशिव मतदारसंघातील 350 गावांना भेटी देऊन त्यांच्याशी चर्चा करुन अडचणी समजाऊन घेतल्या आहेत. अनेक गावांपर्यंत पोहोचण्यासाठी बसची सोय नाही, अनेक गावांना दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासूनही वंचित आहेत. शेतीमालासाठी चांगला दर मिळत नाही, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आणि सहकारी साखर कारखान्यांचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्‍यांची पिळवूणक झाली असल्याने आपल्या संस्थेने साखर कारखान्याची उभारणी करुन उसाचा व वीजेच्या प्रश्नाची काही प्रमाणात सोडवणूक केली आहे. लोकमंगल मल्टीस्टेट बँकेच्यामार्फत लोकांचे प्रश्न सोडिवले आहेत  असेही त्यांनी सांगीतले.
     लोकसभेच्या निवडणूकीत महायुतीने उभे केलेल्या उमेदवाराची मते विभागली जातील व याचा फायदा राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या उमेदवारास मिळेल या प्रश्नावर बोलतांना आपण नागरिकांच्या पक्षाचे उमेदवार आहोत, लोकभावनेचा आदर करुन उभे राहतांना राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या विरोधातच आपली भूमीका कायम राहील असे सांगत महागाई, भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतरही रस्ते पाणी वीज इत्यादी मूलभूत गरजेचे प्रश्न सुटले नसल्याने इतर सुविधांची दारे खुली केव्हा होणार. विकासावर बोलतांना चीन देशाकडून कमी खर्चातील उत्पादने निर्मिती होते. इस्त्राईल देशात शेतीचा विकास अत्यंत चांगला झाला भारताच्या बाबत मात्र केवळ भ्रष्टाचाराची प्रतिमा निर्माण झाली आहे. आजपर्यंत ऊसाच्या जातीवर शेतकर्‍यांचा ऊस नेला जात नव्हता तर व्या माणसांची जात पाहिली जात होती, ट्रॅफिक सिग्नलचे दिवे लावून खूप मोठी प्रगती केल्यासारखे चित्र लोकांना दाखवून वेड्यात काढले जात आहे. परंतू प्रसार माध्यमे घराघरात पोहोचली आहेत. त्यामुळे खरे प्रश्न आणि कार्याची चांगली वाईट जाण लोकांना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
Top