सोलापूर :- राज्यात ऑटोरिक्षा परवान्याच्या वाटपासाठी ऑनलाईन पध्दतीनें अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 27 जानेवारी 2014 पासून सुरु झाली असून दि. 6 फेब्रुवारी 2014 पर्यंत राज्यात सुमारे एक लक्ष 12 हजार अर्ज भरले गेले आहेत. मुंबई उपनगर क्षेत्र व पुणे, पिंपरी - चिंचवड, महापालिका क्षेत्राबाहेर मंजूर होणा-या परवान्यांवर केवळ पेट्रोल इंधनावरील रिक्षाच चालविता येईल ही अट जाचक असल्याने ती रद्द करावी व पेट्रोल बरोबरच डिझेल वरील रिक्षा सुध्दा मान्य करावी अशा स्वरुपाच्या मागण्या विविध क्षेत्रातुन आल्या आहेत. त्याचा विचार करुन शासनाने असा निर्णय घेतला आहे की, सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर महानगरपालिका वगळून इतर क्षेत्रासाठी डिझेल अटोरिक्षा परवान्याकरीता सुध्दा अर्ज करता येईल. तथापि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सोलापूर यांचा यासंबंधीचा निर्णय अंतिम राहिल.
    वरीलप्रमाणे अटीतील शिथिलतेचा लाभ इच्छुक अर्जदारांनी घ्यावा व दि. 15 फेब्रुवारी 2014 या मुदतीपूर्वी आपले अर्ज भरावे असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर, अकलूज यांनी कळविले आहे.
 
Top