उस्मानाबाद -: सर्वच पक्ष एका माळेचे मणी आहेत. हे सर्व पक्ष भ्रष्टाचाराला खतपाणी खालणारे आहेत.या नेत्यांच्या गाड्या,बंगले आणि संपत्ती पाहली तर इतका पैसा यांच्याजवळ येतो कोठून ?  देश आणि राज्य लुटणा-या या लुटारूंना पुन्हा निवडून देणार आहात का,असा प्रश्न आम आदमी पक्षाचे नेते आणि सेवानिवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी येथे विचारला.
    उस्मानाबाद येथील रायगड फंक्शन हॉलमध्ये आम आदमी पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर  शेतकरी संघटनेचे रामजीवन बोंदर,आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक केरबा गाढवे,सहसंयोजक डॉ.महादेव पाटील,अरूण बोबडे,अर्जुन जाधव,धर्मवीर कदम आदी उपस्थित होते.
    राज्य सरकारमधील सर्व खात्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे.पाटबंधारे खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे.करोडो रूपयाचे सिंचनाचे प्रकल्प पुर्ण होत नाहीत,हे माहित असूनही ते प्रकल्प कशासाठी हाती घेतले जातात,असा प्रश्न करून विजय पांढरे म्हणाले की, लोकांना भ्रष्टचाराचा उबग आला आहे.भ्रष्टाचारमुक्त शासन फक्त आम आदमी पक्षच देवू शकतो.या पार्टीचा कोणताही आमदार आणि मंत्री भ्रष्टचार करणार नाही,असे आम्ही ठामपणे सांगतो.दिल्लीच्या जनतेने जे परिवर्तन केले,तसे परिवर्तन उस्मानाबादसह महाराष्ट्रातील जनतेने करावे,असे आवाहनही त्यांनी केले.
    प्रास्ताविक भाषणात डॉ.महादेव पाटील यांनी आम आदमी पार्टीची  उस्मानाबाद जिल्ह्यात १० हजार सदस्य नोंदणी झाल्याचे सांगितले. अरूण बोबडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.केरबा गाढवे गुरूजी यांनी आभार मानले.
सर्व जागा लढविणार
    आम आदमी पार्टी लोकसभेच्या राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढविणार आहे,तसेच त्यानंतर विधानसभेच्या २८८ जागा लढविणार आहे.शरद जोशी आणि रघुनाथआण्णा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने आपला पाठींबा दिलेला आहे, असे विजय पांढरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
    लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दे असतील त्याचबरोबर राज्यातील सिंचन घोटाळ्यासह भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल, असेही पांढरे यांनी सांगितले.लोकसभेच्या निवडणुकीत किती जागा आपला मिळतील,असे विचारले असता,पंधरा दिवसांनतर अभ्यास करून सांगू,असे ते म्हणाले.
    सिंचनाची सर्वाधिक कामे उस्मानाबाद जिल्ह्यात झाली असून,सर्व कामांत भ्रष्टाचार झाल्याचेही त्यांनी सांगितले.कोणत्याही शासकीय योजनेच्या कामांत दलालाची टोळी सक्रीय होते,त्यामुळे योजनेचा बट्टयाबोळ होतो,असेही ते म्हणाले.
 
Top