उस्मानाबाद  :- कधी मनाची गूज सांगणारी कविता तर कधी विदारक सत्य मांडणारी कविता.. कधी शोतकऱ्यांचं सुख मांडणारी तर कधी आईचं दु;ख मांडणारी कविता… अशा एक ना अनेक कवितांनी रसिकांना जणू गुंतवून ठेवले. जिल्ह्यातील मान्यवर कवींच्या बहारदार कवितांनी या ग्रंथोत्सवात जान आणली. एकापेक्षा एक सरस कवितांना रसिकांनीही तितकीच मनमोकळी दाद दिली.
      ग्रंथोत्सवाचा समारोप निमंत्रितांची काव्यसंध्या या कार्यक्रमाने झाला. यात बालाजी इंगळे, राजेंद्र अत्रे, डी.के.शेख, देवीदास पाटील, हनुमंत काळे, शेखर गिरी, युवराज नळे, पंडित कांबळे, भाग्यश्री वाघमारे, प्रमोद माने, डॉ. विजय परदेशी, शंकर कसबे, बाळ पाटील, विजय गायकवाड या जिल्ह्यातील मान्यवर कवींनी सहभाग घेऊन आपल्या कवितेच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. रवींद्र केसकर यांच्या सूत्रसंचलनाने ही मैफील आणखी रंगली.   
     याप्रसंगी डी.के.शेख यांनी प्रेमांची कवितेचे वर्णन करतांना ‘मी काय करु सांगा मी काय करु’ आणि ‘…तुझ्या मागे काय फायदा’ अशा कवितांनी रसिकांना हास्यकल्लोळात बुडविले. डॉ.परदेशी यांची कच-यांचा संदेश देताना, माणूस स्वार्थाचा भुकेला ही कविता, शंकर कसबे यांची ग्रामीण भागातील पाखराचं गाव आणि स्वातंत्र्य वाचवा हो ही कविता वेगळा विषय मांडून गेली. बालाजी इंगळे यांच्या कवितेने एक संदेश दिला.  राजेंद्र अत्रे यांची काठांवर लाठांचा चालतो आहे खेळ, देविदास पाटील यांची अजून जन्मा तुझा इरादा कोठे, प्रा.  हनुमंत काळे यांची नायकिणीची व्यथा मांडणारी कविता सर्वांना अंतर्मुख करुन गेली. विजय गायकवाड यांनी पाऊस, बाळ पाटील यांनी प्रेम म्हणजे काळजाचा अचूक वेध, तर प्रमोद माने यांनी निसर्गावर आधारित काळोख ही कविता सादर केली.     प्रा. शेखर गिरी यांची गझलही श्रोत्यांची दाद घेऊन गेली.
      युवराज नळे यांच्या ग्रामीण भागातील गावाकडे चल पोरा या कवितेतून भीषण वास्तव रसिकांसमोर मांडले. पंडित  कांबळे यांच्या  येवढयावर थांबून भागायचे नाही या कवितेनेही चांगलीच दाद मिळविली.  भाग्यश्री वाघमारे यांच्या गेय कवितेने सर्व रसिकांना सुरेल आवाजातील कवितेचा आनंद दिला.
 
Top