उस्मानाबाद : जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दि. 4 ते 6 फेब्रुवारी 2014 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव उपक्रमास जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रंथोत्सवात विविध विषयांवरील पुस्तके घेण्यासाठी ग्रंथप्रेमींनी गर्दी केल्याचे चित्र तीनही दिवस दिसले. तीन दिवसात तब्बल सव्वा चार लाख रुपयांची पुस्तकविक्री या प्रदर्शनातून झाली. साहित्यरसिकांनी दिलेला हा प्रतिसाद पाहता वाचनसंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उपक्रमाला जणू बळच मिळाले. जिल्ह्यातील मान्यवर कवींच्या बहारदार कवितांचा आस्वाद घेत या ग्रंथोत्सवाचा समारोप झाला.
     जिल्ह्यातील साहित्यिक, कवी,  ग्रंथालय चालक, प्राध्यापक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था अशा एक ना अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या ग्रंथोत्सवाला भेट देऊन आवर्जून पुस्तकांची खरेदी केली.
     राज्याच्या विविध भागातून विविध ग्रंथ व पुस्तकांचे 23 स्टॉल्स  या सहभागी झाले होते. वाचकांसाठी विविध विषयांवरील तसेच नामवंत लेखकांची पुस्तके, आत्मचरित्रे, कथा, कादंबरी, कवीता विषयक पुस्तके तसेच पर्यटन, पाककला, सौंदर्य, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी पुस्तके अशा विविध विषयांवरील पुस्तकेही या ग्रंथप्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली.  ती खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी झाल्याचे चित्र या ग्रंथोत्सवात पाहायला मिळाले.
      उस्मानाबादकर रसिक वाचकांना या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले होते. याचा लाभ त्यांनी घेतला.  ग्रंथ विक्रेत्यांनीही पुस्तकांची विक्री झाल्याने समाधान व्यक्त केले.
        जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तसेच तीन दिवस सुरु असणाऱ्या या उपक्रमास पाठबळ देणाऱ्या शासकीय यंत्रणा, मराठवाडा साहित्य परिषद-उस्मानाबाद, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, नगरवाचनालय, नगरपरिषद वाचनालय, शासकीय ग्रंथालय, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, रसिक वाचक आणि ग्रंथ विक्रेते व वाचक यांचे आभार मानले.
        ग्रंथोत्सवास सहकार्य करणाऱ्या प्रकाशक, पुस्तक विक्रेते, मसापचे पदाधिकारी, सदस्य, सर्व सहकार्य करणाऱ्यांचे यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
       हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील अर्जून परदेशी, अशोक माळगे, शंकर शेळके, मकरंद नातू, अयुब पठाण, सिद्धेश्वर कोंपले, अनिल वाघमारे, अशोक सुरडकर, शशीकांत पवार आणि चित्रा घोडके या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 
 
Top