बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- बार्शीतील भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात काही महिन्‍यांपासून शिक्षकांचे वेतन वेळेवर नाही, तर काही शिक्षकांनी भविष्‍याचा विचार करुन दुसरे महाविद्यालय गाठले. विद्यार्थ्‍यांची फी वेळेवर मिळत नसल्‍याचा कारणास्‍तव काही विद्यार्थ्‍यांना वर्गाबाहरे काढण्‍यात आल्‍यानंतर विद्यार्थ्‍यांनी पाहिजे त्‍या मार्गाने पैसे उपलब्‍ध केले व जागेवर पोहोच केले. फीची रक्‍कम पोहोच करुनदेखील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्‍याने विद्यार्थ्‍यांनी अनेकवेळा तक्रारी केल्‍या. विद्यार्थ्‍यांनी शेवटी आंदोलनाचा पवित्रा घेत महाविद्यालयाच्‍या मैदानात ठाण मांडले. संस्‍थेचे संचालकांनी विद्यार्थ्‍यांशी चर्चा केली व तोडगा काढण्‍याचे आश्‍वासन दिले.
    यापूर्वी काही शिक्षकांनीही पगारीसाठी आंदोलनाची पवित्रा घेतल्‍यावर काही रक्‍कम त्‍यांना देण्‍याची आली तर उर्वरित रकमेचे आश्‍वासन देण्‍यात आले. काही दिवसांवर परीक्षा घेऊन ठेपल्‍या असतांनाही विद्यार्थ्‍यांच्‍या फी आणि शिकवण्‍यांच्‍या प्रश्‍नामुळे शैक्षणिक वातावरण गढूळ झाले आहे.
    ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी बार्शीत महाविद्यालय काढण्‍यात येत असल्‍याच्‍या चर्चा रंगल्‍या. परंतु थोड्याच कालावधीत शिक्षणाचा दर्जा, सुविधा यांचा प्रश्‍न निर्माण झाल्‍याने बार्शीचे नाव बदनाम होत आहे. चांगल्‍या दर्जाचे शिक्षक उपलब्‍ध करण्‍यात आले परंतु त्‍यांच्‍या वेतनाचे विविध प्रश्‍न निर्माण होत असल्‍याने शिक्षक कमी होत आहेत.
 
Top