सोलापूर -: अन्न सुरक्षा अधिनियम 2013 द्वारे पात्र लाभार्थ्यांच्या हक्काचे असलेले धान्य त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेच पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता खात्याचे मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी केले.
    बार्शी येथे अन्न सुरक्षा अधिनियम 2013 च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष कादर तांबोळी, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, डॉ. गुलाबराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण, तहसिलदार बालाजी सुर्यवंशी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना श्री. सोपल म्हणाले की, एका चांगल्या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे.  नवी मुंबईत राज्यातील योजनेचा शुभारंभ झाला. शासनाचा मोठा हा क्रांतीकारक कार्यक्रम राबविला जात आहे. ग्रामीण भागातील 74 टक्के तर शहरी भागातील 45 टक्के लोकांना याचा लाभ होणार आहे. देशाला अन्न धान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण करण्यासाठी देशातील शेतक-यांनी खुप प्रयत्न केले आहेत. यामुळे देशात गेल्या दहा वर्षात अन्न धान्याचे उत्पादन वाढले असल्याचे सोपल यांनी सांगितले.
    या अन्न सुरक्षा कार्यक्रमाद्वारे लोकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळालेच पाहिजे सर्वांनी हक्काबाबत दक्ष राहिले पाहीजे, या चांगल्या उपक्रमाचा नागरिकांना लाभ झाला पाहिजे. याकरिता या कार्यक्रमाचा सर्वत्र चांगला प्रसार झाला पाहिजे. या योजनेचा कोणता लाभार्थी लाभ घेऊ शकतो याबाबत प्रभावीपणे जनजागृती झाली पाहिजे. यामुळे विनाकारण होणा-या तक्रारी कमी होतील व गैरसमज दुर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन सोपल यांनी केले.
    यावेळी बोलतांना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विजयसिंह देशमुख म्हणाले की, देशातील गरीब माणसासाठी अन्न धान्याची हमी देणारा हा कायदा देशात सुरु करण्यात आला आहे. पारदर्शक पध्दतीने याबाबतचा कारभार झाला पाहिजे, हा कार्यक्रम अधिक विस्तारित पध्दतीने व पारदर्शकपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन केले जात आहे. अन्न धान्य साठवणूकीसाठी शासनाने गोडाऊन बांधण्याचा कार्यक्रमही हाती घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात 9 गोडाऊन बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे सांगितले. तर जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण म्हणाले की, कमी दरात धान्य देण्याचा शासनाचा हा महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. गरीबांपर्यंत धान्य पोहोचले पाहिजे याची दक्षता घ्यावी याबाबत तक्रारी आल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल असा ईशारा दिला.
    प्रारंभी तहसिलदार सुर्यवंशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविकात या कार्यक्रमाबाबतची माहिती दिली.
    याप्रसंगी पालकमंत्री सोपल यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात अंत्योदय व बीपीएलच्या लाभार्थ्यांना धान्य देण्यात आले.
 
Top