उस्मानाबाद :- अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येत असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. कोणीही या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिल्या.उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील नवीन व्यायाम शाळेच्या उदघाटनप्रसंगी दिल्या. यावेळी जिल्हापरिषदेचे ॲड. धीरज पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण सरडे, सिनेट सदस्य नितीन बागल, नायब तहसीलदार प्रभू जाधव, आदि उपस्थित होते.
कोंड येथे आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे उदघाटन व दलित वस्ती सुधार योजनेतून सभागृहाचे भुमीपूजन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी चव्हाण म्हणाले की, व्यायाम शाळेमुळे नव युवक आपले आरोग्य उत्तमरित्या ठेवू शकतील. व्यायामामुळे मन प्रसन्न राहते व चांगले कार्य करण्याची बुध्दी सक्रीय होते. चांगले काम करताना अनेक अडचणी निर्माण होत असतात. परंतु त्यावर मात करुन न डगमगता सक्रीय रहावे.
चव्हाण पुढे म्हणाले की, शासनाने गोरगरीबांसाठी अन्न सुरक्षा कायदा, राजीव गांधी जीवनदायी योजना अंमलात आणून त्यांना मदतीचा हात दिला आहे. गरीबांना मोठ्या दुर्धर आजारावर शस्त्रक्रिया व औषधोपचारीता सुमारे दिड ते दोन लाख रुपये शासन मदत केल्याने जिल्ह्यातील 450 नागरीकांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी या भागातील विविध गावांचे सरपंच, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.