उस्मानाबाद :- लोकसभा निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल याची जबाबदारी सर्व शासन यंत्रणांनी घ्यावी. शासकीय जागेत अथवा कार्यालयामध्ये आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी जनजागृती करण्यात येत असून सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
       येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी डॉ. नारनवरे यांनी निवडणूकविषयक पूर्वतयारी आणि भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध निर्देशांसंदर्भात माहिती देण्यासाठी कार्यालय प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभुदय मुळे, उपजिल्हाधिकारी बी. एस.चाकूरकर, शिल्पा करमरकर, श्रीरंग तांबे, श्री. लाटकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब वानखेडे आदींसह विविध विभागांचे अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
       मतदानाची जिल्ह्यातील टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांमध्ये जनजागृती वाढविण्यासाठी यापूर्वी विविध उपक्रम राबविण्यात आले. मात्र, अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे यासाठी जिल्ह्यात ‘जबाबदारी अभियान’ सुरु करण्यात येणार आहे. मतदार म्हणून नोंदणी केलेल्या प्रत्येक नागरिकाने मतदान केलेच पाहिजे. प्रत्येकाचा हा हक्क असून सर्वांनी तो बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.
       आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या इमारतींचा कोणत्याही प्रकारे राजकीय वापर होणार ही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यात अनधिकृतरित्या कोणत्याही ठिकाणी बॅनर्स, झेंडे असतील तर ते काढून टाकण्यासंदर्भात संबंधितांना सूचना द्या. त्यानंतरही कार्यवाही झाली नसेल तर सदर बॅनर्स, झेंडे काढून त्यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करा, अशा सक्त सूचना डॉ. नारनवरे यांनी दिल्या.
      शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक काळात मुख्यालय सोडू नये, असे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिले. निवडणूक काळात प्रचारसभांसाठी मैदाने, सभागृह, मोकळी जागा देताना सर्वांना समान न्याय हे तत्व वापरावे. तसेच राजकीय पक्ष अथवा उमेदवारांना हवे असणारे परवाने एकाच ठिकाणी देण्यासंदर्भात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याबाबत विचार सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले.
       निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारे जाणीवपूर्वक चुका होणार नाहीत हे पाहा. तसेच नि:ष्पक्षपातीपणे आपली भूमिका पार पाडा, असा सल्ला त्यांनी विविध कार्यालय प्रमुखांना दिला. अधिकारी-कर्मचारी यांनी निवडणूक काळात नियमितपणे भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणारी माहिती अभ्यासावी. तसेच जिल्ह्याच्या संकेतस्थळावरही निवडणूक आयोगाचे महत्वाचे निर्णय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाचे निरीक्षकजिल्ह्यात आल्यानंतर त्यांना नेमकी माहिती विहित वेळेत मिळेल, याची प्रत्येक कक्षप्रमुखाने काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
    निवडणूक काळात कोणताही अधिकारी-कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्ष अथवा उमेदवारांशी संबंधित काम करता कामा नये. राजकीयदृष्ट्या आपण तटस्थ असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
 
Top