पांगरी (गणेश गोडसे) :- पंधरा दिवसांपुर्वी बार्शी तालुक्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील द्राक्ष उत्पादकासह सर्वसामान्य शेतक-यांची उभी असलेली व हातातोंडाशी आलेली पिके उध्वस्त केल्यानंतरच विश्रांती घेतली आहे. अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील शेतक-यांचे कंबरडेच मोडले असुन उठुन बसण्‍यासाठी थोडासा आधार म्हणुन ते शासनाच्या नुकसान भरपाईपोटी मिळणा-या तुटपुंज्‍या नुकसानीच्या अनुदानाकडे डोळे लावुन बसले असुन ती रक्कम नेमकी कधी मिळणार या विवंचनेत बळीराजा सापडला आहे.
    बार्शी तालुक्यात 26 फेब्रुवारी पासुन अवकाळी पावसाने सुरूवात केली होती. दि.10 मार्च पर्यंत पावसाळयाप्रमाणे अवकाळी पाऊस गारांसह दैनंदीन हजेरी लावुन शेतक-यांची पिके नेस्तनाबुत करण्यात गुंतला होता. बार्शी तालुक्यातील द्राक्ष, गहु, ज्वारी, हरभरा, दाळिंब, आंबा आदी पिकांचे गारपीठ झाल्यामुळे अतोनात नुकसान झाले होते. दि 26 व 27 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या पिकांच्या नुकसानींची पाहणी करून तसा अहवाल सादर करण्‍याचे आदेश शासनातर्फे कृषी खात्यास दिल्यानंतर व पंचनाम्याचे काम अंतिम टप्‍प्‍यात आल्यानंतर पुन्हा बार्शी तालुक्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. पंचनामा करण्‍याचे व इतर सोपस्कर पार पाडण्‍याचे काम संबंधित विभागांकडुन अजुनही सुरूच असल्याचे समजते. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्‍यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्रात आलेले असुन त्यांच्या अहवालानंतरच पुढील प्रक्रिया पुढे सरकणार असल्याचे वृत आहे. केंद्रीय पथक पाहणी कधी करणार व अहवाल कधी देणार यावरच शेतक-यांना मिळणा-या नुकसान भरपाईचे भवितव्य अवलंबुन आहे. उक्कडगांवसारख्या भागात 70 वर्षात एवढया मोठया प्रमाणात कधीच गारपीट झाली नसल्याचे तेथील वयोवृदधांनी सांगितले होते. येथील नदीला मोठया प्रमाणात पाणी वाहिले होते. ज्वारी काळी पडली, गहु, हरभरा पाण्यात फुगला, द्रांक्षे नासली. निसर्गाच्या रौद्रावतारात अनेक कोंबडया व वन्य पशु पक्षीही जग सोडुन गेले.
    बार्शी तालुक्यात सलग तीन वर्ष भीषण दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी कंगाल झाला होता. तीन वर्षांनंतर चालु हंगामात वरूणराजाने जेमतेम अशीच हजेरी लावुन बळीराजाला काळया आईची ओटी भरण्‍यास भाग पाडुन पिके चांगली आली होती़. शेतातील उभ्या पिकांची काढणी, मळणी करून ती पिके बाजारपेठेत नेऊन पैसै हातात पडणार अशी स्वप्ने तो उराशी बाळगुन असतानाच अचानक अस्मानी संकटांने आक्रमन करून उभी पिके मातीमोल करून टाकली. कर्जे कशी फेडायची हा मोठा प्रश्‍न तालुक्यातील शेतक-यांसमोर उभा राहीला आहे. प्रतिवर्षीच अवकाळी पाऊस अचानक येऊन शेतक-यांचे होत्याचे नव्हते करून जातो. त्यामुळे अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ या गोष्‍टी गृहीत धरून शेतक-यांनीही आपल्या पिकात बदल करणे गरजेचे असल्याच्या मतापर्यंत अनेकजण पोहचले आहेत.
    पदाधिका-यांनी दौरे करून जनतेला धिर देत नुकसानभरपाई मिळेल असा आशावाद देत सांत्वन केले. शासनाच्या पथकाने बार्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून प्राथमिक नुकसानीच्या अंदाजासह पंचनाम्याचे अहवाल शासनाच्या वरिष्ठ विभागांना सुपुर्द केले आहेत. मात्र अहवाल सादर होऊन व राज्यस्तरीय नेत्यांनी लवकरच नुकसान भरपाई अनुदान देण्‍यात येईल असे आश्‍वासन देऊनही त्यांच्या घोषणा हया हवेतच विरत असल्यासारखे वाटत आहे. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थतीला आटोक्यात आणण्‍यासाठी निवडणुक आयोगाचीही काही अडचण राहिलेली नसुन त्यांनी भरपाई देण्‍यास संमती दिली असल्याचेही समजते. एवढे होऊनही आपदग्रस्त झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई अद्यापही वितरीत करण्‍यात येत नसल्यामुळे शेतक-यांमधुन आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
    देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहु लागलेले असल्यामुळे त्याचा फायदा होणार की तोटा हे येणारा काळच सांगणार आहे. काहीही असले तरी सध्या मात्र कोणाही राजकारण्‍यांना अवकाळीच्या तडाख्यात सापडुन मातीमोल झालेल्या शेतक-यांच्या प्रश्‍नाकडे पाहण्‍यास वेळ मिळत नसल्याचे दृश्‍य आहे. अपवादात्मक कांही पुढारी अवकाळीचा फायदा घेत आपल्या प्रचाराचा रथ पुढे दामटत असल्याचे पहावयास मिळत आहे. खोटे नाटे का असेना भोळया भाबडयांचे डोळे पुसण्‍यात पुढारी मंडळी सरसावली असली तरी ते मदत कधी मिळवुन देणार हा प्रश्‍न अधांतरीच राहीला आहे. अवकाळीचा फटका बसल्यापासुन एक-दोन दिवसात नुकसान भरपाई मिळुन जाईल अशा खोटया आश्‍वासनांची खैरात नेत्यांकडुन वाटली जात आहे.
    अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईची प्रक्रिया वेगात सुरू असुन लाभार्थी शेतक-यांनी बँक खात्याची पासबुक झेरॉक्स संबंधीत गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावीत असे आवाहन कृषी खात्यातर्फे करण्‍यात आले आहे. गावातील एका जरी शेतक-यांचा खाते नंबर कार्यालयास प्राप्त न झाल्यास संपुर्ण गावातील इतर लाभार्थी व गावे वेठीस धरली जाणार आहेत. पैसै जमा होताना आवक व जावकेत तफावत रहाणार नाही याची काळजी घेण्‍यासाठी प्रत्येक शेतक-यांचे बँक खाते नंबर गरजेचा राहणार आहे. प्रत्यक्ष शेतक-यांच्या खात्यावर रक्कम मिळण्‍यास साधारणः दोन ते तिन आठवडयाचा कालावधी लागु शकतो असे अधिका-यांनी सांगितले. मात्र जोपर्यंत शासनाकडुन शेतक-यांच्या पदरात कांही पडत नाही तोपर्यंत शेतकरी रोज मदतीची चातकाप्रमाणे वाट पाहत बसणार.
 
Top