बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या व गारपिटीच्या संकटाने शेतकरी होरपळून गेला आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या. निवडणुका पुढे ढकलणे शक्य नसले तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मनसे पक्ष सज्ज आहे. मनसेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख अमित रसाळ आणि शहराध्यक्ष विराज विभूते यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष अनिल मुळे यांनी दिली.
    मागील दहा वर्षांपासून बार्शी तालुक्यातील खासदार नाही त्यामुळे या भागात विकास होत नाही. पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण समर्थपणे पेलवू, आजपर्यंत बार्शी तालुक्यावर मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे. निवडणुकीसंदर्भात मतदारसंघाच्या सर्व तालुक्यातील गटाध्यक्षांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बार्शी तालुक्यातील सर्व ३०९ केंद्रातील गटाध्यक्षांची नेमणूक केली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात जनतेचा कौल असून कार्यकर्त्यांमध्येही निवडणुकीसाठी उत्साह आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना पक्षाचा पाठींबा राहील. तालुक्यात ११२ शाखा कार्यरत असून, एस.टी.बस.कर्मचार्‍यांचे आंदोलन प्रभावीपणे यशस्वी केले आहे. १४९० पदवीधर मतदारांची नोंद केली. दुष्काळग्रस्तांना १०० पिण्याच्या पाण्याच्या टाकी वाटप केल्या, मतदारसंघातील सर्व संघटनांना आपण बरोबर घेणार तसेच नवीन मतदारांचा फायदा होईल असेही त्यांनी म्हटले.
 
Top