पांगरी (गणेश गोडसे) -: पुणे-लातुर राज्यमार्गावर पांगरीपासुन पाच कि.मी.अंतरावर असलेले व विकासापासुन कोसो दुर राहीलेले व जेसीबी चालकांचे गांव अशी महाराष्ट्रात ओळख असलेल्या पुरी (ता. बार्शी) या गावाला विकासाची तहान लागली असुन अंतर्गत रस्त्यांचा अभाव अरूंद व खडेमय रस्ते, महिला सुलभ शौचालयाचा अभाव कायम व शुध्‍दीकरण व कायम पाणीपुरवठा योजनेचा अभाव, गटारींचा अभाव, विजेचा लपंडाव, राजकारण्‍यांचे दुर्लक्ष यासह विविध समस्यांच्या विळख्यात सध्या पुरी ग्रामस्थ आपले जिवन व्यथित करत असुन या समस्यांच्या दृष्टचक्रातुन आम्हाला बाहेर काढा, आम्हालाही आदर्श जीवन जगु द्या, अशी हाक या गावातील सर्वसामान्य स्त्री, पुरूष व आबालवृदध देत आहेत. गावाच्या शेतीला कायम पाणीपुरवठयाचा स्तोत्र उपलब्ध नसल्यामुळे बहुतांशी शेती ही कोरडवाहु आहे.
    साधारणतः अडीच हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या व शेती हा उदरनिर्वाहाचा महत्वाचा स्तोत्र असलेल्या पुरी गावच्या मागासलेपणास राजकारण्‍यांचाच मोठा हातभार असल्याचे ग्रामस्थांमधुन बोलले जात आहे. तरूणांच्या हाताला काम नसल्यामुळे अनेक तरूणांनी गावातुन स्थलांतर करून राज्यभरातील जेसीबी मशिन चालवुन त्यावर आपली उपजीविका करत आहेत. जवळपास छोटया पुरी गावात शंभरच्या आसपास जेसीबी चालकांची संख्या आहे. गावाला कोणत्याच शासकीय योजनांचा लाभ झाला नसल्यामुळे सरकारी योजनां म्हणजे काय असते याची कल्पनाच अनेकजनांना नसल्याचे निदर्शनास येते. शासन अनेक सार्वजनिक हिताच्या लाखो रूपयांच्या योजना ग्रामीण भागातील जनता, स्त्रीयांच्या जिवनमान उंचावण्‍यासाठी राबवत असताना पुरी गांव मागे का? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
गावात सुलभ शौचालयाचा अभाव
शासन एकीकडे गावे हागनदारीमुक्त करत निर्मग्राम योजना यशस्‍वी झाल्याचा डांगोरा पिटत असताना पुरी गावात सुलभ शौचालयाच्या योजनेबाबात माहितीच नाही. गावात सुलभ शौचालयाचा अभाव असल्यामुळे महिलांना रस्त्यावरच शौचास बसावे लागते. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासन वेगवेगळया माध्यमाने अनुदानातुन शौचालये बांधण्‍यास प्राधान्य देत असताना येथील जनतेला यापासुन कोणी दुर ठेवले याचाही विचार होणे गरजेचे आहे. फक्त विचार करूनच न थांबता महिलांच्या इज्जतीसाठी तरी किमान गावात व घराघरात ही शौचालये बांधण्‍याची मोहिम यशस्‍वी होणे गरजेचे आहे.
कायम पाणीपुरवठा योजनेची गरज
    पुरी ग्रामस्थांना सध्या गावातील दोन पाण्याच्या स्त्रोतातुन पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या पाणीपुरवठा करण्‍यात येणा-या स्त्रोत्रापैकी एक स्त्रोत्र तर शौचालयाच्या स्थानाच्या मध्येच आहे. पाणीपुरवठा करण्‍यात येणा-या दोन्ही ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. जनतेला होणारा पाणीपुरवठा हा शुध्‍दीकरण न करता डायरेक्ट केला जातो. त्यामुळे भविष्यात ग्रामस्थांना विविध साथीच्या आजारांना सामोरे जावे लागण्‍याची शक्यता आहे. तरी गावासाठी किमान शुध्‍द पाणीपुरवठयाची एखादी योजना तरी वरिष्ठांनी मंजुर करावी अशी पुरी ग्रामस्थांची मागणी आहे.
अंतर्गत रस्त्यांचा अभाव
पुरी गावातील रस्ते हे अनेक वर्षांपासुन जैसै थे अशाच अवस्थेत आहेत. अरूंद व खड्डेमय रस्ते, रस्त्यावरच गटारीचे पाणी अशी येथील रस्त्यांची अवस्था आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांचे मुरमीकरण अथवा क्रॉक्रिटीकरण करणे गरजेचे असताना याकडे कोणीच गांभिर्याने पाहताना दिसुन येत नाही. किमान रस्ते, पाणी, विज आदी किमान मुलभुत गरजा तरी उपलब्ध करूण द्या, असा आर्त टाहो येथील जनता फोडताना दिसत आहे.
उच्चपदस्थांची उदासिनता
पुरी या छोटयाश्‍या गावातील अनेकजण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मोठ-मोठया पदावर विराजमान आहेत. मात्र गावातील हेवेदावे, राजकीय फरफट, एकीचा अभाव, संधीसाधु माणूस यामुळे गावातील पुढारलेले व इतरत्र विखुरले गेले अनेक बुध्‍दीवादी व आर्थिक बाबतीत सधन झालेले नागरीक गावाकडे दुर्लक्ष करताना दिसुन येत असल्याचे समजते. त्यांनी मागे फिरून 'माय भुमीचे ऋण फेडीन पांग सारे' असे म्हणुन गावच्या विकासाला हातभार लावण्‍यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
गावच्या विकासासाठी अनोखे आंदोलन
पुरी सारख्या छोटयाश्या गावात जन्मलेल्या व सध्या गावांपासुन साधारणतः 600 कि.मी.दुर अंतरावर पत्रकारीता करत असलेल्या निलेश झालटे या तरूण पत्रकाराने आपणही गावासाठी कांहीतरी करावे या उदात्त हेतुने सोशल मिडीया फेसबुकमधुन अनोख्या पध्‍दतीचे आंदोलन उभे केले आहे. त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी महत्वाचे दुवे असलेल्या सर्वाशी सोशल मिडीयातुन संपर्क साधुन फक्त मतांसाठी गावाकडे फिरकणा-या राजकारण्‍यांना गावाच्या विकासातही लक्ष घालण्‍याचे आवाहन करून लक्ष न घातल्यास एक वेगळे आंदोलन करण्‍यात येईल, असे ठणकावुन सांगितले आहे.
     पुरी गावात तरूणांना रोजगाराच्या संधीचा अभाव आहे. तरी गावाच्या विकासासाठी तरी मतभेद, पक्षभेद विसरून एकत्रित येऊन विकास साधने गरजेचे आहे. शासनाच्या अधिका-यांनी याकडे लक्ष केंदित करून मानवी किमान गरजांच्या पुर्ततेकडे लक्ष द्यावे, अशी पुरी ग्रामस्थांची मागणी आहे.
 
Top