नळदुर्ग -: होर्टी (ता. तुळजापूर) या गावात अज्ञात चोरट्यांनी दोन घरफोडी करुन रोख रक्‍कमेसह सोन्‍याचांदीचे दागिने असे मिळून सुमारे सव्‍वा लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्‍याची घटना घडली आहे. या घटनेची नळदुर्ग पोलिसात नोंद झाली आहे.
    तुळजापूर तालुक्‍यातील होर्टी या गावातील मारुती सहदेव भोसले हे शुक्रवारी रात्री घरी झोपले होते. त्यांची आई दरवाजास कुलूप लावून कट्ट्यावर झोपली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेजा-यांच्या घरास बाहेरून कडी लाऊन भोसले यांच्या दरवाजास लावलेले कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला.     घरातील लोखंडी पेटी फोडून चोरट्यांनी त्यातील १९ ग्रॅमं सोन्याचे दागिने, एक मोबाईल हॅन्डसेट, १० तोळ्याचे चांदीचे दागिने व ३ इरकल साड्या आदी साहित्य लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी केशव निवृत्ती सगर यांच्याही घरावर डल्ला मारून घराचे दार तोडून लोखंडी पेटी आणि सुटकेस पळविली. शेजारील शेतात आंब्याच्या झाडाखाली लोखंडी पेटी आणि सुटकेस टाकून १० हजार रुपये, दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबत मारुती भोसले व केशव सगर यांनी पोलिसात तक्रार दिल्‍यावरुन अज्ञात चोरट्यांविरुध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख हे करीत आहेत.
 
Top