बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : गौडगाव (ता.बार्शी) येथील कर्मवीर लोकरे गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून डोनेशनसाठी विद्यार्थ्याची वारंवार पिळवणूक करण्यात येत आहे. याबाबत विद्यार्थ्याच्या पालकांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे.
    विकी विजयानंद पौळ रा.आळजापूर ता.बार्शी असे या विद्यार्थ्याचे नांव असून त्याने एक वर्षांचा डिझेल मेकॅनिकचे प्रशिक्षण संस्थेतून पूर्ण केले आहे. संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याने संस्थाचालक व शिक्षकांकडून डोनेशनसाठी होणार्‍या मानसिक त्रासाला कंटाळून सहा महिन्यापूर्वी विष प्राषण करुन आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे. परंतु अद्यापही विद्यार्थ्यांकडून वारंवार डोनेशनची मागणी करण्यात येत असल्याने पालकवर्गांतून संतापाची लाट निर्माण झाली आहे. प्रशिक्षणापूर्वी प्रवेश घेतांना विद्यार्थ्याच्या पालकांनी आपण चर्मकार समाजाचे आहोत आपली परिस्थिती नसल्याने विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी जादा खर्च करु शकत नाही असे स्पष्ट सांगीतले होते. त्यावेळीच कोणत्याही प्रकारचे डोनेशन देण्याची गरज नाही आमची संस्था अत्यंत नामवंत असल्याचे सांगून कर्मवीर लोकरे गुरुजी यांच्या विचाराने ही संस्था चालविण्यात येत आहे व गरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न सोडविण्याच्या प्रमुख उद्देशासाठीच आमच्या संस्थेने औद्योगिक शिक्षण सुरु केले आहे असा वारंवार विश्वास संस्थेने पालकांना दिला आहे. यावेळी विद्यार्थ्याकडून शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, इयत्ता दहावीची गुणपत्रिका इत्यादी प्रकारची सत्य प्रमाणपत्र स्कॅनिंग करुन वरिष्ठांना मेल करण्याचा बहाणा करुन संस्थेने ताब्यात घेतली आहेत. शाळेची साडेसहा हजारांची वार्षिक फी घेऊन पावतीदेखिल दिली जात नाही. मागील दिड वर्षांपासून संबंधीत विद्यार्थ्याला डोनेशनच्या मागणीचा तगादा लावण्यात येत आहे. विद्यार्थ्याची कागदपत्रे अडवणूक करुन पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे पालकांनी यावेळी सांगीतले.
 
Top